सोलापूर :- महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा शासकीय ग्रंथालय, मराठी भाष विभाग, आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 5 ते 7 मार्च पर्यंत ग्रंथोत्सव-2013 चे आयोजन करण्यात आले आहे.
    स्व. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणा-या या महोत्सवात विविध साहित्यीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, तीनही दिवस शासकीय प्रकाशन व खाजगी प्रकाशकांचे ग्रंथ विक्रीस उपलब्ध होणार आहेत.
    ग्रंथोत्सवाचे उदघाटन दि. 5 मार्च रोजी सकाळी 11.00 वा. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी सायंकाळी 4.30 वा. जुन्या ग्रंथांचे महत्व व उपलब्धता या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तानाजी ठोंबरे भूषविणार असुन प्रा. डॉ. सुहास पुजारी, प्रा. डॉ. राजेंद्र दास, प्रा. डॉ. महेंद्र कदम, प्रा. हरिदास रणदिवे सहभागी होणार आहेत. 
    ग्रंथोत्सवाच्या दुस-या दिवशी दि. 6 मार्च रोजी सकाळी 11.00 वा. शालेय विद्यार्थ्यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम होणार असून याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार भूषविणार आहेत. याच दिवशी सायं. 4.30 वा. ग्रंथ प्रसारामध्ये वृत्तपत्रांचे योगदान या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी दै. लोकमतचे संपादक राजा माने हे भूषविणार आहेत. तर दै. दिव्य मराठीचे निवासी संपादक संजीव पिंपरकर, दै. सुराज्यचे संपादक राकेश टोळ्ये, दै. सकाळचे सहयोगी संपादक दयानंद माने व सोलापूर विद्यापीठ वृत्तपत्रविद्या विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. रविंद्र चिंचोलकर सहभागी होणार आहेत.
    दि. 7 मार्च रोजी सायं. 4.30 वा. शालेय विद्यार्थ्यांचे कविता वाचन होणार असुन  या कार्यक्रमास प्रा. योगीराज वाघमारे व प्रा. अशोक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सायं. 6.00 वा. महापौर अलका राठोड आणि जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या उपस्थितीत तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप कार्यक्रम होणार आहे.
    तरी या ग्रंथोत्सवास सर्वांना विनामूल्य प्रवेश असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
 
Top