देशाला जगात सुधारलेल्‍या वैद्यकीय ज्ञानाने व सुविधा सवलतीने दोन यक्षप्रश्‍न देशापुढे व समाजव्‍यवस्थेपुढे उभे केले, एक प्रश्‍न वाढत्‍या लोकसंख्‍येचा तर दुसरा प्रश्‍न वृध्द नागरीकांचा, वाढत्‍या वैद्यकीय उपचारामुळे स्वातंत्र्य मिळताना असलेले सरासरी वयोमान दुप्पटीहून वाढले आहे.
    लोकसंख्‍येतही ज्‍येष्ठ नागरीकांचे प्रमाण 7 टक्‍क्‍याहून जवळ जवळ 40 टक्‍केपर्यंत वाढलेले आहे. दरवर्षी या संख्‍येत व प्रमाणात वरचेवर भर पडत आहे. एकाच घरात सेवानिवृत्त आईवडील, तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेला मुलगा अशी कुटुंबव्‍यवस्था निर्माण झाली, म्‍यात भर म्हणून, करीयरच्‍या मागे पळणारा नातू व त्‍याची बायको असा चमत्करीक त्रिकोण, चौकोन निर्माण झाला. तीन चार पिढ्यांचा संग्रह, एकाच घरात झाल्‍यावर मग कुठल्‍याही कारणावरून संघर्षाची ठिणगी पडली की, घरातले वृध्द या आगीत होरपळून निघतात. वृध्दत्व ही अवस्था ही एकदा जळण्‍यासारखी नसून, सतत धुपणा-या आगीसारखी असते!
    धावत्‍या जगामुळे प्रत्‍येक पिढीची संस्कृती बदलते, आचार विचार बदलतात. साधनसामुग्री बदलते, मानसिकता बदलते, नैतिक मूल्‍याच्‍या कल्पना बदलतात व हे बदल मानविण्‍याचे व पचविण्‍याचे सामर्थ्‍य जुन्‍या पिढीत नसते, त्‍यामुळेच संघर्षाचे प्रश्‍न निर्माण होतात, या सर्व संघर्षात जास्त त्रास होत असेल तर तो वृध्द पिढीला होतो. पूर्वी प्रत्‍येक पिढीला वैचारीक अंतर (जनरेशन गॅप) निर्माण होत होता असे म्हटले जात होते. तथापि हे अंतर आता पाच-दहा वर्षाला गतिमान युगात वैचारीक दुरावा देत आहे. या गतिमानतेत सर्वात अडगळीत पडलेला व नकोसे असलेला घटक म्हणजे घरातील ‘वृध्द मनुष्यम’ आहे.
    आपली घरातील किंमत कमी झाली? आपले विचार कोणीही विचारात घेत नाही, निर्णय घेताना आपला विचार ऐकला जात नाही, याची खंत वृध्दांच्‍या मनाला वेदना देत असते. कुठल्‍याच प्रकारचे मानसिक वेदनाशामक जवळ नसते. प्रत्‍येकजण आपल्‍याच प्रश्‍नात, समस्‍येत गुंतलेला असतो, नात्‍या गोत्‍याचे संबंध डोक्‍यावरच्‍या केसासारखे विरळ झालेले असतात. पैपाहुण्‍यांनी, समवयस्कांनी स्वर्गाचा मार्ग स्वीकारलेला असतो. जीवन जगू देत नाही, आणि मृत्‍यू जवळीक साधत नाही, अशा संध्‍याछायेच्‍या प्रकाशात जीवन व्‍यतीत करणारे वृध्द पाहिल्‍यानंतर सर्वानांच वाईट वाटणे सहाजीकच आहे. एके काळी काळ गाजवणारी माणसे गलीतगात्र झालेली असतात. लेखणीच्‍या, छडीच्‍या व डोळ्याच्‍या धाकावर इतरांना व स्वकीयांना थरथर कापावयास लावणारी ज्ञानाच्‍या सत्तेच्‍या व आर्थिक बळावर सर्वांवर नियंत्रण ठेवणारी माणसे हतबल झालेली दिसतात. सर्वत्र नैराश्‍यांचा, विषादाचा व अपमानजनक परिस्थितीचा अंधकार भरून राहीलेला असतो. अशा अवस्थेत अनेकजन वृध्द शापीत जीवन जगत असतात. समाजातील जे ज्‍येष्ठ नागरीकांचे प्रमाण वाढत असताना समाजव्‍यवस्था, प्रशासन, कुटुंबव्‍यवस्था काहीच करीत नाही. त्‍यामुळे वृध्दांच्‍या जीवनात औदासिन्‍याची जास्त भर पडते. तमनाला गारवा देणारी एखादी तरी झुळूक यावी, अशी प्रत्‍येकांची अपेक्षा असते. पण हे घडत नाही. वृध्दत्व हा विराण माळराणावर असो अथवा झोपडट्टीत किंवा वातानुकुलीत घरात असो, तो एकाकी निवडूंगाचे जीवन जगत असतो!

कौटुंबिक व्‍यवस्थेतून विश्‍लेषण :

    जवळ जवळ सर्वच कुटूंबात, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आयुष्‍यमान वाढले की, हा प्रश्‍न अजूनही वाढणार आहे. इतर देशात विशेषतः पाश्‍चात्‍य राष्ट्रात व अमेरिकेत कुटूंबव्‍यवस्था ही मुळातच कमकुवत असल्‍यामुळे म्हातारपणी वृध्दाश्रमाचा आसरा घेणे काहीच गैर नाही. याउपर शहराच्‍या एका भागात वृध्दांसाठी काही जागा बांधकामे राखून ठेवून, वृध्दांच्‍या वसाहतीचे नियोजन केले जाते. आपली कुटुंब व्‍यवस्था इतकी परंपरावादी आहे की, प्रत्‍येक व्‍यक्‍तींचे मूल्‍यमापन त्‍यांच्‍या कौटुंबिक यशस्वीतेवरून केले जाते. लहानपणी जीवाच्‍या पलीकडे जाऊन जपलेली नितीमूल्‍ये ज्‍यांचे आयुष्‍य घडविण्‍यासाठी आतोनात कष्ट घेतलेले मुलेबाळे, अनेक मार्गानी ङ्कदतीचा हात दिलेले मित्रवर्ग व सहकारी अनेक कठीण प्रसंगात तन मन धनाने मदत केलेले नातेवाईक, ज्‍यावेळेस दूर जातात, विचारत नाहीत, टाळतात, त्‍यावेळेस आयुष्‍याची अवस्था आकाशत दोरी तुटलेल्‍या पतंगासारखी झालेली असते. आपल्‍या जीवनाचा काहीही उपयोग नाही, आपण कुटुंबातील किंवा समाजातील अडगळीचे सामान झालेले आहोत, अशी जाणीव निर्माण होणे, हीच अवस्था अत्‍यंत अवहेलनात्‍मक असते. काही वेळेस आठवणीतील मोती उगळताना हाताला कोळशाचा रंग लागतो!

संबंध स्वतःच्‍या मुलाबाळाशी :
    वृध्दत्व म्हणजे अनिच्छेने जगायचे चवहीन, रसहीन, ध्‍येयहीन वाटचाल अशी व्‍याख्‍या झाली आहे. अशा अवस्थेत जीर्ण व कळाहीन वस्त्रावर कितीही रंग भरला तर तो आनंददायक ठरू शकत नाही. लहानपणापासून तळहाताच्‍या फोडाप्रमाणे जपलेली मुले यांचे एक रम्‍य स्वप्न घेऊन समस्त मानवप्राणी जगत असतो, लग्न जमविताना मी आई बापाच्‍या सांगण्‍याबाहेर नाही, असे म्हणणारा आज्ञाधारक सुपूत्र, लग्न झाल्‍यानंतर वर्ष, सहा महिन्‍यात आईबापास घराच्‍या बाहेर काढतो किंवा स्वतः वेगळा राहतो. हा सगळयात मोठा आयुष्‍यातला मानसिक धक्‍का असतो व तो पचविण्‍याचे सामर्थ्‍य अनेकांना नसते. स्वतःचेच बांधलेले काडीकाडीचा संचय करून घरटे विस्कटताना मन काय म्हणत असेल, याची कल्पना करवत नाही. सध्‍याच्‍या वयातील, मध्‍यमवयातील सर्वांनी आपल्‍या वृध्दापकाळाबद्दलच्‍या संकल्पनाच बदलायला हव्‍यात! म्हणजे नैराश्‍याची झंझावताची तीव्रता कमी होईल!

संबंध नातवंडाशी, संबंध नातेवाईकांची स्वप्नाचा फुलोरा की वास्तवता
    प्रत्‍येकजण आयुष्‍यात एका विशिष्ट वयोमर्यादेनंतर मुलेबाळे ङ्कोठे झाले की, नातवंडाच्‍या स्वप्नात रंगत असतो. स्वप्नाळू मानवी प्राण्‍याचे हे वास्तव होङ्म. पण काळ असा आला आहे की, नातवंडाशी जमत नाही. या तक्रारी प्रत्‍येक घरात आहेत. नवीन पिढ्यांच्‍या अंतरामुळे नातवंडाचा जीवनमार्गच बदलला आहे. मला एका आजोबांनी परवा व्‍यथा म्हणून सांगितले की, पाच वर्षाच्‍या नातवंडाला मला घरातच अपॉंईटमेंट घेऊन भेटावे लागते. वेगळी बेडरुम, शाळा, ट्युशन, खेळ, नृत्‍याचा व गायनाचा क्‍लास, मित्र मैत्रिणीचे वाढदिवस, समारंभ यामध्‍ये नातू एवढा गुंतलेला असतो की, नातवाची व आजोबाची गाठ क्‍वचितच पडते आणि दुरावा निर्माण होतो. वैषम्‍य वाढते व जीवनाची निरर्थकता वाढीला लागते. कॉन्व्हेंट शिक्षण पध्दतीने तर कुटूंब व्‍यवस्थेचा खुळखुळा केला आहे. बालक जास्तीत जास्त घराच्‍या आकर्षणापासून (ऍटेचमेंट) कसे दूर राहील? अशी नेमकी व्‍यवस्था कॉन्व्हेंट शिक्षण पध्दतीत आहे. या पाठीमागे ब्रिटीश साम्राज्‍यवाद्याची जगावर राज्‍य करण्‍यासाठी यंत्रणा तयार करण्‍याची मनोवृत्ती आहे. शिडाच्‍या जहाजातून जगावर राज्‍य करणारे इंग्रज कुटुंब हा विषय पूर्णपणे दूर ठेवी आणि ही जीवन पध्दती स्वीकारली म्हणूनच तत्कालीन राजकारणात त्‍यांचे जगावर साम्राज्‍य राहिले!

सर्वात मोठं शत्रु.... रिकामा वेळ!

    चोवीस तास कामात मग्न राहून, सतत धावपळीत व धडपडीत जीवन व्‍यथीत करणा-यास एकदम मिळणारा वेळ हा सगळ्यात मोठा शाप आहे. रिकामे मन हे सैतानाचे माहेरघर असते. याकरिता मनाची गुंतवणुक हा सगळयात मोठा प्रश्‍न आहे. एका कॉलनीतील, गल्लीतील, सोसायटीतील ज्‍येष्ठ नागरीक येऊन अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवू शकतात.

कांही उपक्रम.... काही प्रेरणा, नाते परमेश्‍वराशी !
    मध्‍यंतरी ठाण्‍यातील मयाळी ज्‍येष्‍ठ नागरीकांनी (मल्‍याळम् वृध्द संघम) अनेक कॉलनीतील लहान मुलांचे जुने कपडे, पुस्तके, शैक्षणिक साहित्‍य, जुनी पादत्राणे एकत्रित करून ती व्‍यवस्थित करून झोपडपट्टीतील मुलांना वाटली, अत्‍यंत मोठ्या पदावरून निवृत्त झालेले अधिकारी सुध्दा गॅलरीतून व अडगळीच्‍या जागेतून अशा वस्तु स्वतःहून काढून घेत. त्‍यापैकी एकाने सांगितले झालेल्‍या त्रासापेक्षा ह्या वस्तू झोपडपट्टीतील बालकांच्‍या हाती देताना मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. मी मध्‍यंतरी एका पंचतारांकित हॉटेलमध्‍ये जेवावयास गेलो असताना एक उंची कपड्याच्‍या सफारीतील वृध्द गृहस्थ ग्राहकांनी टाकून दिलेले अन्न प्लॅस्टीकच्‍या पिशव्‍यातून जमा करीत होता. मला उत्सुकता लागली. विस्तृत चौकशी केल्‍यानंतर असे समजले, हे एक उच्च पदस्थ सेवानिवृत्त सनदी अधिकारी असून त्‍यांची मुले अमेरिकेत असतात. हे उरलेले अन्न ते मुकबधीर अंध शाळेतील विद्यार्थ्‍यांना स्वतःच्‍या गाडीतून पोहचवतात व मगच रात्रीची झोप घेतात. दगडातले देव मी अनेक पाहिले. परंतु माणसातला देव क्‍वचितच पहावयास मिळतो. अक्षरशः दुस-या भेटीत पंचतारांकीत संस्कृती विसरून त्‍यांच्‍या पायावर दंडवत घातले. नागपूरच्‍या माजी सैनिकांनी प्रजासत्ताक दिननंतर रस्‍त्‍यावर पडलेले प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज पायदळी अथवा इतरत्र तुडविले जातात ते एकत्रित करून सन्‍मानपूर्वक विसर्जित केले.
    परवाच एक पुण्‍यातील हकीकत प्रसिध्द झाली आहे. एक वृध्द गृहस्थ कॉलनीमध्‍ये पेपर टाकू लागले. ते सेवानिवृत्त बँक अधिकारी होते. त्‍यांना या कामाबद्दल विचारल्‍यानंतर त्‍यांनी विस्‍मयजनक माहिती दिली. ती अशी की, वृत्तपत्र टाकणा-या विद्यार्थ्‍यांची एस.एस.सी.ची परीक्षा होती. त्‍याला अभ्‍यासाला सवड मिळावी म्हणून हे काम वृध्द स्वच्छेने करीत होते. भारतीय अध्‍यात्‍माने मुक्‍तीचे चार प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजे परमेश्‍वरा जवळची समिपता, सरुपता, सलोकता व सायुज्‍यत्ता या मुक्‍ती सांगितलेल्‍या आहेत. भक्‍तीचा अंतिम परिपाक मुक्‍ती आहे. परमेश्‍वराच्‍या भक्‍ती एवढीच प्रामाणिक समाजसेवा एक आनंददायी मुक्‍तीचा अध्‍यात्मिक आनंद होऊ शकेल. एकंदरीत धार्मिक व सामाजिक कार्यात ज्‍येष्ठांना मन गुंतवण्‍यास खुपच मोठी संधी आहे. समाजातील आपण असहाय्य, व्‍यथीत, अनाथ यांच्‍या जीवनात आनंदाचे काही क्षण जरी निर्माण करू शकलो, तर त्‍या ईश्‍वरी अंशाचा व प्रेरणेचा भाग असू शकतो. याकरीता वृध्दांनी संघटीत होवून समाजउपयोगी धार्मिक, राष्‍ट्रीय उपक्रम राबविणे आवश्ङ्मक आहे. ही श्रेष्ठ मानसिक गुंतवणूक ठरेल.

ज्‍येष्ठ नागरीकांची मानसिकता बदलण्‍याची गरज :
    मला मुलांच्‍या घरी करमत नाही, माझे मन लागत नाही, माझी सगळी माणसे ही दुसरीकडे आहेत. ही वृध्दांची भूमिकाच चुकीची आहे. जेथे आपले मुलेबाळे राहतात तेथेच आपले भाव विश्‍व निर्माण करून तिथेच स्वतःला गुंतवून घ्‍यावे लागते. आपण मुलांमुलीपासून जेवढे दूर राहण्‍याचा प्रयत्‍न करू, तितके मुलाबाळांशी मानसिक अंतर वाढणार आहे. दुरावा निर्माण होणार आहे व हा दुरावा तुम्हाला क्षणाक्षणाला जाळणार आहे. याकरिता पुढील पिढीशी जेवढे जमवून घेता येईल तितके जमवून घेणे, अधिक हितकर ठरेल. नव्‍या पिढीच्‍या आनंदात सामिल व्हा, नकारार्थी भूमिका सोडा, आमच्‍या वेळेस असे नव्हते, आम्ही असे नव्हतो, जुने ते सोने ह्या सगळया गोष्टी विसरा!

समृध्दता हा अभिशाप आहे :
    आजोबाच्‍या काळात दोन भावात एक चप्पलजोड असावयाचा. दोघांनी मिळून तो वापरायचा, पाच भाऊ व चार बहिणी एकाच खोलीत वाढायचे. तर नातवंडाकडे रॅक भरेल इतके शूज, हा बदल पचवावाच लागेल. एक आजीबाई आपल्‍या नातीला परंपरागत कावळा चिमणीची गोष्ट सांगू लागल्‍या, चिमणे चिमणे दार उघड... असे म्हणून कावळयाने दरवाजा ठोठावला असे सांगितल्‍यानंतर नातीने दरवाजावर डोअर बेल नव्हती का? असा प्रश्‍न विचारला. या प्रातिनिधीक उदाहरणावरून काळ किती झपाट्याने पुढे जात आहे व ज्‍येष्ठ नागरीकांनी कसे बदलले पाहिजे हे कळून चुकते. मला एक वृध्द आजीबाई हातात इंग्रजीचे पहिलीचे पुस्तक घेऊन जाताना दिसल्‍या, त्‍यांना विचारल्‍यानंतर त्‍यांनी सांगितले की, नात इंग्रजी शाळेत शिकत असल्‍यामुळे नातीला खेळविण्‍यासाठी अडचण येते. म्हणून मीच इंग्रजी शिकत आहे. कुठल्‍याही परिस्थितीत कुटूंबातील मंदीर मानून त्‍यात आनंद भरा, तरच उर्वरीत आयुष्‍यरुपी नौकेचा प्रवास आनंदमुखी होईल. पूर्वी एका कुटूंबात, एका वाड्यात, गल्लीत, खेडेगावात राहणारी माणसे एकत्रित कौटुंबिक जीवन जगत तेच सामाजिक सहजीवन होते. पूर्ण खेडे हे एक कुटूंब आहे असे समजून जीवन व्‍यतीत करीत. एकमेकांच्‍या जीवनातील आनंद व दुःखाचे प्रसंग वाटून घेत. त्‍यामुळे जगण्‍याची मानसिकता अधिक सुदृढ होत असे. ‘वसुधैव कुटुंबय’ ही संकल्पना तत्कालीन समाज जीवनात राबविली जात होती.

वृध्दाश्रमाची गरज?

    वृध्दाश्रम असावेत की नसावेत, हा प्रश्‍न आता मागे पडला आहे. आता वृध्दाश्रमाचे व्‍यवस्थापन कसे असावे, वृध्दांना एकाकी वाटू नये. कुठल्‍या सुविधा असाव्‍यात, वृध्दांचा मानसिक दुरावा दूर व्हावा, म्हणून समाजातल्‍या सुजाण नागरीकांनी, समाजसेवी संस्थांनी, विद्यार्थ्‍यांनी काय जबाबदारी स्विकारावी, वृध्दाश्रम ही अडगळीत पडलेली संस्था नसून ती समाजाचा अविभाज्‍य भाग असावा. वृध्दांना दिलासा देणारी प्रत्‍येक गोष्ट समाज घटकांनी राबवावी. आपण निकामी झाल्‍यानंतर कदाचित आपल्‍या आयुष्‍याची शेवटची वेळ येथेच घालवावी लागेल. यादृष्टीने समाजातील सर्व घटकांनी जाणीवपूर्वक प्रयत्‍न करावेतत! जेणेकरून वृध्दाश्रमातील वृध्दांचे जीवन चैतन्‍यमय व मानसिकदृष्ट्या सक्षम होईल याचे नियोजन समाजव्‍यवस्थेने करावे. मुळात प्रत्‍येक वृध्दाश्रमाला प्रत्‍येक निवडणूकीत स्वतंत्र मतदार  केंद्र देण्‍यात यावे. एकदा राजकारण्‍यांचे लक्ष गेले की, सर्वच प्रश्‍न सुटण्‍यास मदत होईल.

वृध्दांनी काय करावे?
    वृध्दाश्रमाच्ङ्मा आसमंतातील शाळा कॉलेच्‍या विद्यार्थ्‍यांनी व अध्‍यापकांनी, समाजसेवी व राजकीय संघटनांनी वृध्दाश्रमात जाऊन राष्ट्रीय व धार्मिक सण समारंभ साजरे करावेत. अनेक बालकांना जे आजोबा-आजीच्‍या सुखापासून वंचित आहेत त्‍यांना वृध्दाश्रमातील आजोबा-आजीशी नव्‍याने संबंध (टाय अप) निर्माण करावेत. जीवनातला नकारात्‍मक दृष्टीकोन नाहीसा करून सकारात्‍मक जीवन जगावे, कुटूंबावर, परीवारावर, आसमंतावर प्रेम करावे. सदैव आनंदी वृत्ती जपावी. द्वेष, मान-अपमान, दुराग्रह, जुनी सांस्कृतिक मुल्‍ये, विचार लादण्‍यांचे सोडून द्यावे. आयुष्‍यात जे हातून घडते, त्‍याचे समाधान मनात धरावे, इतरांच्‍या मनातले आनंद द्विगुणीत करावा. असहाय्यतेचा मंत्र सोडून द्यावा. एकंदरीत परमेश्‍वरांनी दिलेले उर्वरीत आयुष्‍य आपण परमेश्‍वराच्‍या आराधनेत, उपासनेत व्‍यतीत करावे. आपल्‍याला मिळालेले दीर्घायुष्‍य हा एक ईश्‍वरी प्रेरणेचाच भाग समजून जीवन जगावे.

तरुणांची जबाबदारी :-

    घरातील वृध्द ही अडगळ नसून ती ‘अमूल्‍य ठेवा’ आहे व तो मी जतन करणारच असा दृढ निश्‍चिय तरुणांनी केला पाहिजे. अनेक रिकाम टेकड्या व उचापती स्त्रीया, तुमच्‍याकडे आईवडील कसे कायम रहातात?  काही तुम्हाला ऑड वाटत नाही का? आई-वडील सांभाळणे म्हणजे एकदम गावंढळपणा असे नाही! ते उद्गार काढून आई-वडील सांभाळणा-यांची मानसिक मानहानी करीत असतात. अशा मनोविकृत स्त्रीयांचे तोंड बंद केल्‍यास समाजातील 90 टक्‍के प्रश्‍न मिटतील? अशा स्‍त्रीया कुटूंबव्‍यवस्था ही माझी व्‍यक्‍तीतीगत बाब आहे. तुम्ही विनाकारण लक्ष घालू नका? असे म्हणून निरुत्तरीत करावे. अशा लावालाव्‍या करणा-या स्‍त्रीयांमुळे सामाजिक दुखणी, मानसिक आजार व कौटूंबिक कलह अनेक पटीने वाढले आहेत. अशा स्त्रीयांना वैचारीक दृष्टीने लांब ठेवणे इष्ट ठरेल. एका कॉलनीतील रहिवाशी सहलीसाठी जाणार होते. बैठकीत एका स्त्रीने दुसरीविषयी बोलताना तिच्‍याकडे वृध्द सासु-सासरे राहतात. म्हणून ती आपल्‍या बरोबर सहलीसाठी येऊ शकणार नाही, असे म्हणून अवमानित केले. यातून अशा सार्वजनिक जीवनात केलेल्‍या शेरेबाजीमुळे दुस-याच्‍या कौटुंबिक जीवनात काय संघर्ष उद्भवतात याचा विचार कुणीही करत नाही. वृध्द सासु-सास-यास सांभाळणारी स्त्री ही काय गुन्हेगार आहे काय? परंतु, अशा समाजकंटकांना प्रतिबंधीत करण्‍याची कुठलीही व्‍यवस्था पुराणकालापासून निर्माण होवू शकली नाही.

इच्छा मरण असावे की नसावे?
    अनेक राष्ट्रातून इच्छा मरणास (मर्सीडेथ) ही परवानगी आहे. वैद्यकीय शास्त्राचा जनक हिप्पोक्रेटीक यास सहमती देत नाही. प्रारंभी ही कल्पनाच अमानवी वाटते. परंतु, दीर्घकालीन व असहाय्य शारीरिक व मानसिक विदाहकता स्वतःचे विधी स्वतः करण्‍यास असमर्थ असणे, वरचेवर कुटूंबात व समाजात कमी होत असलेली सेवाभावी माणसे, म्हणून या बाबीवर पुन्हा एकदा मानवतेच्‍या भुतदयेच्‍या दृष्टीकोनातून विचार करण्‍याची वेळ आली आहे. आपण संसदीय लोकशाही प्रणाली मानतो. जन्‍म झालेल्‍या व्‍यक्‍तीला आपले आयुष्‍य त्‍याच्‍या इच्छेनुसार संपविण्‍याचा अधिकार अद्याप तरी दिलेला नाही. परंतु जी वृध्द माणसे स्वतःचे दैनंदिन व्‍यवहार कोणाच्‍या मदतीशिवाय करू शकत नाहीत. अशांना देहत्‍याग करण्‍याचा अधिकार द्यावा, असा विचार पुढे येत आहे. वृध्दाश्रमांच्‍या व्‍यवस्थापनापुढेसुध्दा अशा विकलांग (बेडरिडन पेशंट) सांभाळण्‍याचा फार मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण अशा असहाय्य माणसांच्‍या स्वच्छतेसाठी मनुष्‍यबळ उपलब्ध होणे कठीण झाले आहे. शरपंजरी पडलेल्‍या भीष्‍माची इच्छित कालापर्यत सांभाळ केला असा पुराणकालीन दाखला आहे. तथापि वास्तवतेत हे काम फार कठीण आहे. प्रश्‍न मानवी हक्‍काच्‍या मर्यादेचा असला तरी या मानवी सेवेसाठी माणसे उपलब्ध होत नाहीत ही वास्तवता आहेत!

वृध्दत्व कसे असावे?
    वृध्दांनी कसे वागावे याची संहिता नव्‍याने तयार करावयास हवी. कारण काही वेळेला वृध्द हे जुने विचार, आचार व संस्कृती सोडावयास तयार नसतात त्‍यामुळे तरुणपिढीपुढे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. वृध्दांनी सकारात्‍मक दृष्टीकोन ठेवून तरूण पिढीच्‍या सर्व कार्यामध्‍ये सहकार्य व सद्भावना ठेवावी. आमच्‍या काळात असे नव्हते, ‘जुने ते सोने’ अशा कालबाह्य कल्पना सोडून दिल्‍या पाहिजेत. याचबरोबर सर्व वृध्दांची एकच शेरेबाजी असते सध्‍याचे हे काही टिकणार नाही, सर्व काही लयाला जाणार आहे. हे नकारार्थी व टाकावू विचार सोडून द्यावेत. वृध्दांची भूमिका फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड अशी असावी. प्रसंगी मॉरल अँण्ड मेंटल असिस्टंट म्हणूनही काम करावे. आपले आयुष्‍य हे कोणास भार होणार नाही, याची दक्षता घ्‍यावी. मिळणारी सुन ही सोशिक, सहनशील व सात्वीक असेल ही सुतराम शक्‍यता नाही. चांगल्‍या सुना मिळणे हे वृध्दा महदभाग्‍य आहे. त्‍याचबरोबर नव्‍या पिढीने आपल्‍यावर कायम अवलंबून रहावे अशी धारणाही सोडून द्यावी. स्‍वतःचा वृध्दापकाळ किती सुखकर करता येतो. यासाठी आपल्‍यात आवश्‍यक ते मानसिक, शारीरिक व बौध्दीक बदल घडवून आणणे ही काळाची गरज आहे.
    एकंदरीत बालपण हा परमेश्‍वराचा अनंत आशिर्वाद असलेली रम्‍य पहाट तारुण्‍य हा ऊनसावल्‍याचा खेळ तर वृध्दापकाळ हा संध्‍याछायेच्‍या काळातील वाटेकडे डोळे लावून बसणारा कंटाळवाना प्रवास!

* अशोक शं. कुलकर्णी (बेंबळीकर)
    उस्‍मानाबाद

 
Top