महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .            सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्यासमोर दुष्काळासारखे नैसर्गिक संकट उभे ठाकले आहे. या संकटाला सामोरे जाताना विधानमंडळातील चर्चेला उत्तरे देताना नेत्यांचा कस लागतो आहे. राज्यावर मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित संकट येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक संकटाना राज्याने व पर्यायाने राज्यातील नेत्यांनी खंबीरपणे तोंड दिले आहे. संकटाचा सामना करुन आणि त्यातून बाहेर पडून राज्य आजही देशात सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. या राज्याचा पाया घालणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी विधान मंडळात केलेल्या भाषणांचा व त्यांच्या तत्कालीन कार्यपध्दतीचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
    प्रतापगडावर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते. त्यावेळी पंडितजीं समोर निदर्शने होणार होती. यशवंतराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. प्रतापगडावर पंडितजींच्या कार्यक्रमासाठी जे लोक जाणार होते त्यांना ट्रकने जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि पंडितजींच्या विरोधी निदर्शने करणाऱ्या समितीच्या निदर्शकांना ट्रकने वाईला जाण्याची परवानगी नाकारली होती. मुंबई राज्याच्या त्या वेळच्या विधानसभेत सरकारच्या या परस्पर विसंगत भूमिकेवर वादळी चर्चा झाली. काँग्रेसने आयोजन केलेल्या कार्यक्रमाला ट्रकने माणसे नेण्याची परवानगी मिळते आणि शांततामय मार्गाने निदर्शने करु इच्छिणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना ट्रकने माणसे नेण्यास परवानगी दिली जात नाही, अशी सकृतदर्शनी यात विसंगती होतीच, त्यावेळी विधानमंडळाच्या चर्चा दर्जेदार असत, त्या चर्चेमधून बुध्दीचा कस प्रखरपणे व्यक्त होत होता. एस.एम.जोशी, आर.डी. भंडारे, आचार्य अत्रे, ए.बी.बर्धन, उध्दवराव पाटील, दत्ता ताम्हाणे, दत्ता देशमुख अशी दिग्गज मंडळी विरोधी पक्षाच्या बाकावर असतांना आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असताना हे बौध्दीक सामने अधिक रंगत असत.
    परवानगी द्यायची आणि परवानगी नाही द्यायची या दोन्ही निर्णयाची बरीच चिरफाड झाल्यानंतर यशवंतराव शांतपणे बोलायला उठले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, परवानगी द्यायची आणि नाही द्यायची हे दोन्ही  निर्णय माझेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत असतांना त्यांचा जय जयकार करायला जाणाऱ्या राज्यातील कोणत्याही माणसाला थोपवणे शक्य नव्हते, त्यामुळे ती परवानगी देणे आवश्यक होते. दुसरीकडे परवानगी  नाकारली, कारण छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करायला देशाचे पंतप्रधान येत असतांना, पुतळ्याचे अनावरण करु नका असे सांगणाऱ्यांना एकत्र जमा होऊ द्यावयाचे नाही, हीच भूमिका सुसंगत होती. कायदा व सुव्यवस्था सरकारला पाळावयची असेल तर जमाव न जमवण्याची खबरदारी सरकारलाच घ्यावी लागेल. त्याची काळजी मी घेतली. निदर्शकांना ट्रकने माणसे नेण्याची परवानगी दिली असती आणि त्या जमावाने हिंसक कृत्य केले असते तर त्याचे उत्तर मलाच द्यावे लागले असते, आणि म्हणून माझा निर्णय योग्य आहे.                        
अभिभाषणावरील चर्चा
    16 फेब्रुवारी 1961 रोजी राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेत यशवंतराव चव्हाण यांनी जे भाषण केले आणि यात शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींवर केलेली चर्चा आजही उदबोधक आहे हे आपल्याला लक्षात येईल. यशवंतराव म्हणतात. "शिक्षण आणि शेती हे महत्वाचे विषय आहेत. माध्यमिक किंवा प्राथमिक शिक्षक या दोन्ही प्रकारच्या शिक्षकांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. लक्षावधी  मुलांना योग्य शिक्षण देवून त्यांना उत्तम नागरिक बनविण्याचे काम त्यांच्यावर अवलंबून असते. काही मॅनेजमेंटमध्ये अलीकडे जरी बिझनेसची वृत्ती आली असली तरी त्या संस्था ज्यांनी काढल्या ती ध्येयवादी माणसे होती. त्यापैकी काही थोडीशी बिझनेसवाली असली तरी पुष्कळशी मंडळी शिक्षणाचा प्रसार व्हावा या ध्येयाने पुढे आल्यामुळे महाराष्ट्रात अशा अनेक संस्था निघालेल्या आहेत. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे राज्यात आले होते तेव्हा त्यांनी. महाराष्ट्रात खासगी शिक्षण संस्थांनी शिक्षण संस्था काढून शिक्षणाचा प्रसार केला आहे, देशात कोठेही इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रयत्न झालेला नाही. अशा शब्दात महाराष्ट्रातील शिक्षणाविषयी गौरवोद्गार काढले होते. राष्ट्रपतीचे हे उद्गार ऐकून आपल्या शिक्षण संस्थेमध्ये दोष दिसत असले तरी माझ्या अंगावर मुठभर मांस चढले.
    24 ऑगस्ट 1960 रोजी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टीकोनासंबंधी चर्चा करताना शेती विषयी यशवंतरावजी म्हणतात. "दुष्काळी भागात शेकडो मैल लांबी आणि रुंदीचे पट्टे असून त्यात असलेल्या जमिनी लागवडी खाली आणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी कोरडवाहूच राहणार आहेत. यासाठी इरिगेशनच्या योजना हाती घ्याव्या की कोरडवाहू जमिनीवर सॉईल  कन्झर्वेशन व लॅंड डेव्हलप करण्याच्या दृष्टीने बंडिंग्ज, विहीरी सारखे मायनर इरिगेशनचे कार्यक्रम हाती घेऊन आपले सामर्थ्य खर्च करावे असा प्रश्न निर्माण होतो. इरिगेशनच्या ज्या मोठ्या योजना आहेत त्याची प्राथमिक तयारी, खर्च इत्यादी गोष्टी होऊन त्या पूर्ण झाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष फायदा हाती पडेपर्यंत सात ते दहा वर्षाचा कालावधी लागेल व त्या अवधीपर्यंत शेतकऱ्यांना वाट पहावी लागेल. तेव्हा मोठ मोठया इरिगेशनच्या योजनांना प्राधान्य द्यावे की मायनर इरिगेशनच्या कार्यक्रमाला महत्व द्यावे असा पेचाचा प्रश्न निर्माण होतो. अशा महत्वाचा प्रश्नांबाबत शासनास निश्चित धोरण करावे लागेल."
    अशा प्रतिनिधिक भाषणांचा अंशातून यशवंराव चव्हाणांचा अभ्यास, चाणाक्षवृत्ती आणि दूरदृष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो. यशवंतरावाच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
 
Top