पंढरपूर :- राज्यातील नऊ जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा तसेच चारा टंचाईचा प्रश्न उपस्थित झाला आहे..केंद्र व राज्य शासन दुष्काळ निर्मूलनासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. या परस्थितीमध्ये जनतेने संयम बाळगावा. दुष्काळ निर्मूलनाबाबत शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशा शब्दात केद्रिंय कृषीमंत्री यांनी मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे-चिंचाळे येथील नागरीकांना दिलासा दिला. 
         मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे-चिंचाळे येथील सिंमेट बंधारे व चारा छावणीची पाहणी केल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांसमोर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
    अन्नधान्याबाबत देश स्वंयपुर्ण आहे. गत वर्षी 100 लाख टन तांदुळ तर 50 लाख टन गव्हाची निर्यात करण्यात आली आहे. यंदा दुष्काळीस्थिती जाणवत असून या परस्थित शेतक-यांनी पशुधन वाचविण्याला व हिरवा चारा निर्मीतीला प्राधान्य द्यायला हवे अशी अपेक्षा श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
     या प्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पिण्याच्या पाणी प्रश्नाबाबत केंद्रिय कृषी मंत्र्यांनी लक्ष द्यावे त्याचबरोबर जुन अखेर जिल्ह्याला पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे 32 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगून सध्या जिल्ह्यात 1284 पाणी पुरवठा योजना सुरु असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.तर ताकारी-म्हैसाळ योजनेचे पाणी वाढेगांव पासून माण नदीत सोडण्यात यावे त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्याला 2 टी.एम.सी. पाणी मिळावे अशी मागणी आ.भारत भालके यांनी केली.
       तत्पूर्वी चारा छावणीतील उपस्थितांशी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आपुलकीने संवाद साधत चारा छावणीतील उपस्थित महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येईल. त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी तेथेच कौशल्य पुर्ण प्रशिक्षण देण्यात येईल.  चारा छावणीच्या एक किमी परिसरात रो.ह.योची कामे सुरु करण्यात येतील तसेच मुलांसाठीच्या आरोग्य व शिक्षण या बाबींना प्राधान्य देण्यात येईल साधारणता पुढील 16 आठवड्यामध्ये हा कार्यक्रम टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येईल अशी माहिती आयुक्तांनी दिली.  
       याप्रसंगी  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जि.प अध्यक्षा डॉ.निशिगंधा, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम माळी, जेष्ठ आमदार सर्वश्री. बबनदादा शिंदे,  हनुमंतराव डोळस,  दिपकआबा सांळुखे पाटील, उदय सामंत, एस.टी. महामंडाळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे,  जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, मनोहर डोगरे, संतोष पवार,जिल्हा कृषीअधिक्षक अशोक किरनाळी, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.     
 
Top