उस्मानाबाद -: दारूच्या नशेत जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालत पत्रकारांना वार्तांकन करण्यापासून मज्जाव करून धक्काबुक्की करणा-या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर प्रवीण इंगळे याच्याविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला होता.
       एका हल्ल्यातील घटनेचे वार्तांकन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात  गेल्यानंतर शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दैनिक ‘दिव्य मराठी’चे  शहर प्रतिनिधी राम खटके आणि छायाचित्रकार आरिफ शेख यांना दारूच्या नशेतील डॉक्टर प्रवीण इंगळे याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून वार्तांकन करण्यास मज्जाव केला. त्यानंतर धक्काबुक्की करून तो निघून गेला. त्याने अतिदक्षता विभागात रुग्णांसमोर मोठ्याने आरडाओरड करून तमाशा केला. त्यानंतर त्याचा अवतार कॅमेºयात कैद करण्यात आला. ‘दिव्य मराठी’च्या टीमसोबत पंगा घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने रुग्णालयातून धूम ठोकली. दरम्यान, त्याच्या या वर्तणुकीविषयी ‘दिव्य मराठी’चे छायाचित्रकार आरिफ शेख यांनी रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार केली असून, या तक्रारीवरून इंगळे याच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येणार आहे. आरिफ शेख यांच्या फिर्यादीवरून इंगळे याच्याविरुध्द शनिवारी शहर पोलिसांत भादंवि 323, 504 अन्वये गुन्हा दाखल क रण्यात आला आहे.
 
इंगळेची दादागिरी रोखणार का?
      जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर प्रवीण इंगळे याची वर्तणूक जिल्हा रुग्णालयासाठी डोकेदुखी ठरत आहे. तो जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना नेहमी त्रास देतो, याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी  सांगितले.  त्यामुळे अशा डॉक्टरवर रुग्णालय आता कोणती कारवाई  करणार, त्याची दादागिरी प्रशासन कधी रोखणार आहे,  असा सवाल विचारला जात आहे.

कठोर कारवाई करणार?
      डॉक्टर प्रवीण इंगळे यांच्याविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत.  आपण इतरांसोबत सौजन्याने वागले पाहिजे.  गैरवर्तणुकीला प्रशासन थारा देणार नाही. त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल.  त्यासाठी चौकशी समिती नेमून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.
- डॉ. अशोक धाकतोडे, जिल्हा शल्य चिकित्सक, उस्मानाबाद.
 
Top