तुळजापूर -: सावकाराकडून घेतलेल्‍या कर्जासाठी पतफेड करण्‍यासाठी सतत होणा-या धमकीला व जाचास कंटाळून एका शेतक-याने आत्‍महत्‍या केल्‍याची खळबळजनक घटना आपसिंगा (ता. तुळजापूर) येथे घडली.
    परमेश्‍वर रूद्राप्‍पा अंदाने (वय 38, रा. आपसिंगा, ता. तुळजापूर) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या शेतक-याचे नाव आहे. यातील परमेश्‍वर अंदाने यांची दोन एक्‍कर जमीन असून त्‍यांनी त्‍यात सव्‍वा एकर द्राक्षाची बाग लावली आहे. ही बाग लावण्‍याकरीता त्‍यांनी गावातील सावकाराकडून वीस टक्‍के शेकड्याप्रमाणे सुमारे दोन लाख रूपयाचे कर्ज घेतले होते. मात्र दुर्दैवाने कर्ज घेतल्‍यानंतर काही दिवसातच दुष्‍काळ पडल्‍याने व अपु-या पाण्‍याअभावी त्‍यांची संपूर्ण द्राक्षेची बाग वाळून गेली. त्‍यातच सावकार कर्जाची परतफेड करण्‍यासाठी सतत पैशाची मागणी करत होता. त्‍यातच घराची जागाही सावकाराने बळकावलने दिवसेंदिवस सावकाराच्‍या कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. अशा परिस्थितीत सावकाराच्‍या सतत होणा-या जाचास कंटाळून त्‍यांनी आपल्‍या राहत्‍या घरात द्राक्ष बागेर फवारण्‍याचे विषारी औषध पिवून आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यांना लगेचच उपचारासाठी सोलापूर येथील रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्‍यांचा मृत्‍यू झाला.
 
Top