बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- विद्यार्थ्‍यांनी लहानपणी समाजातल्‍या प्रत्‍येक गोष्‍टीची निरीक्षण करुन प्रत्‍येक कलेमध्‍ये सहभाग नोंदवा, सकारात्‍मक आयुष्‍य जगण्‍याचा आनंद घेतला पाहिजे. त्‍यातुनच उद्याच्‍या आदर्श भारताचा नागरिक घडत असतो. लहानपणी मोठ्यांच्‍या चांगल्‍या गोष्‍टींचे अनुसरुन करुन स्‍वतःमध्‍ये बदल घडवले पाहिजे, अशा कार्यक्रमामधून उद्याचा चांगला कलावंत घडत असतो, असे प्रतिपादन राजेंद्र मिरगणे यांनी केले.
         बार्शी येथील जिजाऊ पब्लिक स्‍कुल यांच्‍यावतीने यशवंतराव चव्‍हाण सांस्‍कृतिक भवन याठिकाणी आयोजित करण्‍यात आलेल्‍या वार्षिक स्‍नेहसंमेलनाच्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर फरतडे हे होते तर व्‍यासपीठावर पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले, मधुकर डोईफोडे, कु. प्रिती जाधव, अशोक सावळे, अँड. प्रकाश गुंडे, संस्‍थेचे अध्‍यक्ष शिवाजीराव पवार, प्राचार्य विलास शिंदे आदी मान्‍यवर उपस्थित होते.
       यावेळी मुलांनी आपल्‍या वैयक्‍तीक कलांमधुन गाणी, डान्‍स, नाटक, मिमिक्री आदी गोष्‍टी मोठ्या उत्‍साहाने सादर केल्‍या. त्‍यामध्‍ये मराठी व हिंदी गीतांमधून विद्यार्थ्‍यांनी धमाल उडवून दिली. भावगीते व भक्‍तीगितांमधून विद्यार्थ्‍यांनी आपली कला सादर केली. यावेळी महाराष्‍ट्र गर्जा हा विशेष कार्यक्रम कवी टिंगेरे यांच्‍या नृत्‍य दिग्‍दर्शकातून सादर करण्‍यात आला. यावेळी प्राचार्य अशोक सावळे, गजेंद्र मनसावले, प्रिती जाधव यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला पालक वर्ग मोठ्या संख्‍येनी उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संस्‍थेचे अध्‍यक्ष शिवाजीराव यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. वासिक शेख यांनी केले.
 
Top