सोलापूर :- समाजातील वर्तमानाच्या प्रश्नांची उत्तरे प्राचीन ग्रंथात मिळू शकतात. ती उलगडल्यास भविष्याची चांगली वाटचाल होऊ शकेल असे प्रतिपादन प्रा. तानाजी ठोंबरे (बार्शी) यांनी केले.
    येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात  ग्रंथोस्तव 2013 निमित्त आयोजित, जुन्या ग्रंथांचे महत्व व उपलब्धता या विषयावरील परिसंवादात अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
     या परिसंवादात प्रा.डॉ.राजेंद्र दास, प्रा.डॉ.सुहास पुजारी, प्रा.डॉ.महेंद्र कदम, प्रा.हरिदास रणदिवे आदींनी सहभाग नोंदविला.
    यावेळी बोलतांना प्रा. ठोंबरे म्हणाले, सकस समाज निर्मितीसाठी जुन्या ग्रंथांची आवश्यकता असून बहुतांशी जुने ग्रंथ विविध कारणाने दुर्मिळ होत असून त्याची उपलब्धता होऊन नव्या पिढीकडे त्याचे हस्तांतरण होणे गरजेचे आहे.
    प्रा.राजेंद्र दास म्हणाले, आज विविध क्षेत्रातील समस्येबरोबर संशोधनाच्या समस्येचाही अभाव जाणवतो आहे. जुने ग्रंथ सांभाळणे, त्याचे वाचन करणे, अन्वयार्थ लावणे, चिंतन-मनन करणे आवश्यक आहे. तर प्राचीन ग्रंथ हे तत्कालीन काळाचा आरसा आहे. अनेक जुने उपयुक्त संदर्भ ग्रंथ राजे-राजवाड्यामध्ये बंदिस्त स्वरुपात असल्याने त्याचे डीजीटालायझेशन करुन नवीन पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचविले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. रणदिवे यांनी केले.
    प्रा. डॉ. सुहास पुजारी म्हणाले की, आज बहुतांशी नव्या ग्रंथालयात नवीनच ग्रंथ उपलब्ध असतात, नव्या पिढीला चांगल्या जुन्या ग्रंथाची माहिती व जाणीव होत नाही.असे सांगून पुण्य संपत्ती सारख्या जुन्या ग्रंथाचे महत्व असल्याचे सांगितले. तर डॉ. महेंद्र कदम यांनी आज इंटरनेटवर अनेक प्राचीन ग्रंथ उपलब्ध होत आहेत परंतू नवीन पिढी याचा उपयोग करणार आहे का?  असा प्रश्ल उपस्थित करुन प्राचीन काळातील आयुर्वेंदाला जसे महत्व आले आहे. त्याचप्रमाणे आज प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात प्राचीन ग्रंथांना महत्व प्राप्त झाल्याचे सांगितले.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन फारुक बागवान यांनी केले. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी, माजी जि.मा.अ. युन्नुस आलम सिध्दीकी, जिल्हा ग्रंथालयाचे श्री. क्षीरसागर, अड. गोविंद पाटील यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top