सोलापूर :- नागर संस्कृतीला वाचन संस्कृतीची जोड मिळाली तर बुध्दीची मशागत उत्तमरित्या पाडली जाते असे प्रतिपादन सोलापूर ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
       महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा शासकीय ग्रंथालय, मराठी भाषा विभाग, आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 5 ते 7 मार्च पर्यंत स्व. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ग्रंथोत्सव-2013 चे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी  पालकमंत्री बोलत होते.. यावेळी व्यासपीठावर जि.प.चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, प्रा. नसीम पठाण, प्रा. अशोक गायकवाड, प्रा. योगीराज वाघमारे, उमेश पाटील, निलेश राऊत, जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी आणि शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री. क्षीरसागर उपस्थित होते.
       आपल्या उद्घाटनपर भाषणात पालकमंत्री श्री. ढोबळे पुढे म्हणाले की, आज बाजारामध्ये उत्तमोत्तम ग्रंथांची उपलब्धता नाही त्यामूळे अनेक चांगले ग्रंथ नव्या पिढीला वाचनासाठी मिळत नाहीत. अशा प्रकारच्या ग्रंथोत्सवामूळे निश्चितच वाचन संस्कृतीला उभारी मिळेल. पुस्तकांच्या स्टॉल्समूळे अनेक चांगले ग्रंथ वाचकांना खरेदी करता येतील. व्यक्तीच्या कर्तुत्वाची फुटपट्टी पुस्तकांमूळेच उंचावते. समाजामध्ये दलित, विद्रोही यासह अन्य साहित्य क्षेत्रात उत्तम काम घडले पाहिजे जेणेकरुन दर्जेदार साहित्य वाचनासाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षाही त्यानीं व्यक्त केली.
     प्रा. अशोक गायकवाड यावेळी म्हणाले की, आज नवीन इंटरनेट संस्कृतीमूळे पेपरलेस ग्रंथ वाचत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना जगभरातील पुस्तकांचा खजिना उपलब्ध झाला आहे. परंतू भाषिक पुस्तकांसाठी मात्र आता अशा प्रकारचे ग्रंथोत्सव होणे गरजेचे आहे. प्रत्येक महाविद्यालयात, शाळांमध्ये वाचन संस्कृती जोपासली जावी म्हणून अधिकाधिक विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त करण्याची आवश्यकता असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
     प्रा. नसीम पठाण मार्गदर्शन करताना म्हणाले की, पुस्तकांच्या किंमतीपेक्षा पुस्तकातला आशय हा अधिक महत्वाचा असतो. चार आण्यांच्या पुस्तकामधून मिळालेल्या ज्ञानाची किंमत पैशात मोजता येत नाही. ज्ञानाचे व्यासपीठ अधिकाधिक पुस्तकांच्या वाचनामूळे समृध्द होत जाते. भाषिक पुस्तकांमधील भाषा आजच्या विद्यार्थ्यांना कळून अवगत होणे गरजेचे आहे. भाषेचे सौंदर्य पुस्तक वाचनानेच अधिकाधिक खुलते. त्यामूळे मातृभाषेतील पुस्तके प्रत्येक विद्यार्थ्यांने, व्यक्तीने वाचलीच पाहिजेत.
    प्रा. योगीराज वाघमारे म्हणाले की, ग्रंथ चळवळीला प्रोत्साहन मिळण्याकरिता अशा ग्रंथोत्सवांची आज गरज आहे कारण पुस्तकांमूळेच समाजाची निर्मिती होत असते. त्यांच्यावर संस्कार करण्याचे कामही विविध पुस्कांतील भाषा सौंदर्यामधून होते. ग्रंथ विकत घेताना काही लोकांना आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. अशावेळी वाचनासाठी म्हणून पुस्तकाची देवाणघेवाण केली पाहिजे. वाचन टिकले तरच समाज टिकेल असेही शेवटी ते म्हणाले.
    ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानंतर पुस्तक विक्री प्रदर्शनाचे उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तकांच्या सर्व स्टॉलला त्यांनी भेट देवून काही पुस्तकांची खरेदी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन फारुक बागवान यांनी केले.
      या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शासकीय प्रकाशन व खाजगी प्रकाशकांचे ग्रंथ विक्रीस उपलब्ध आहेत.
 
Top