सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता पाणी अडवा, पाणी जिरवा कार्यक्रमावर विशेष भर देण्यात यावा. जवाहर विहिरी व सिंचन विहिरीची कामे तातडीने पूर्ण करण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे रोहयो व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी राहेयो मंत्री डॉ. राऊत यांनी मागील वर्षी पूर्ण झालेल्या विहिरीच्या कामाचा आढावा घेवून पूर्ण झालेल्या विहिरी लाभार्थ्यांना समारंभपूर्वक देण्यात याव्यात. विहिर पुनर्भरण्याच्या कामाकडे लक्ष द्यावे. पाण्याची पातळी कमी झाल्याने कृषी विभागाने कोणकोणती कामे केली पाहिजेत याबाबतची त्वरीत माहिती सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
    या बैठकीत जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे विभाग, कृषी विभाग, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक वनीकरण आदि विभागाची सुरु असलेली कामे, मजूर उपस्थितीबाबत डॉ. राऊत यांनी सविस्तर आढावा घेतला.  रोहयेची कामे करतांना लोकांचा विश्वास संपादन करावा. स्वयंसेवी संस्थांच्या भूमिकेतून काम करावे. या कामात दिरंगाई झाल्यास सहन केली जाणार नाही असा इशाराही डॉ. राऊत यांनी दिला.  या बैठकीत संबंधित खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 
 
Top