बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- सोलापूर रोड येथील नवरात्र महोत्सवाच्या उत्सव मुर्तीच्या समोर ओल्या कुंकवाची पाऊले उमटल्याची अफवा अवघ्या काही वेळेत पसरल्याने बार्शीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली.
     याबाबत जागा मालक प्रकाश पारप्पा माळी यांनी सदरच्या ठिकाणचे पूर्वीचे पूजारी सुनिल व अनिल गायकवाड यांनी जागेच्या वादातून सदरचा प्रकार केल्याचे व कायदा सुव्यवस्था बिघडवून अशांतता निर्माण केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार बार्शी पोलिसांत देणार असल्याचे म्हटले आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की, न.पा.हद्दीतील सि.स.नं.3935 या जागेचा दिवाणी कोर्टात असलेला दावा तडजोडीने मिटला होता व यात नवरात्र महोत्सावाची देवीची मुर्ती माळी यांनी त्या ठिकाणहून स्वत:च्या जागेत नेण्याचे कबूल केले होते. परंतु रविवारी अचानक पाऊले उमटल्याची चर्चा सुरु झाल्याने सदरची घटना वार्‍यासारखी पसरली व मोठ्या प्रमाणात  गर्दी जमा झाली. सदरचा प्रकार हा जाणीवपूर्वक अंधश्रध्दा पसरविण्याच्या हेतूने झाल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे माळी यांनी म्हटले आहे. सदरच्या ठिकाणी जमा झालेले लोक विविध प्रकारचे तर्क वितर्क करुन एकमेकांना सांगत आहेत.

 
Top