बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : खैराव (ता. माढा) येथे दि. 10 ते 12 मार्च दरम्यान 10 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
    खैराव येथील ग्रामदैवत नागन्नाथ महाराज यांची यात्रा व महाशिवरात्रीचे औचित्य साधून ग्रामीण भागातील कवी फुलचंद नागटिळक यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या संमेलनाचे आयोजन केले आहे.
    या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रीत पत्रिका शुक्रवार दि. 1 रोजी बार्शीतील भगवंत मंदिरात प्रकाशित करण्यात आली. यावेळी कवयित्री सुमन चंद्रशेखर, अरुण चंद्रशेखर, कुबेर थिटे, मदन जगताप, शब्बीर मुलाणी, आयोजक फुलचंद नागटिळक, ह.भ.प. विलास जगदाळे, रामचंद्र इकारे, महारुद्र जाधव आदि उपस्थित होते.
    या संमेलन स्थळाला कै.ना.विलासराव देशमुख साहित्य नगरी तसेच कवि संमेलन स्थळाला कै. कविवर्य सुरेश पाठक व्यासपीठ असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ संपादक राजा माने, संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यीक व उपनिबंधक श्रीकांत मोरे, आ. बबनराव शिंदे, धनाजीराव साठे, राजनजी पाटील, निर्मलाताई ठोकळ, शिवाजीराव सावंत, जि.प.अध्यक्षा डॉ.निशीगंधा माळी, अरुण कापसे, दादासाहेब साठे, सुनिल मोरे, जयसिंगराव नागटिळक, प्रशांत जोशी, रविंद्र नागटिळक, नागेश कदम, अरविंद मोटे, शरीफ सय्यद आदि उपस्थित राहणार आहेत.
    या संमेलनात दि.10 रोजी ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, महारुद्र जाधव यांचे व्यंगचित्र प्रदर्शन, प्रदिप गायकवाड यांचे बासरीवादन, स्वागतगीत, विविध क्षेत्रातील कतृत्ववान व्यक्तींना पुरस्कार वितरण, ग्रामीण भागात विविध संमेलनाचे आयोजन करण्यार्‍यांना माय मराठीचे वारसदार पुरस्कार, काव्यजागर, दि.11 रोजी धनगरी ओव्या, व्याख्यान, ग्रामीण स्त्रीयांचे मराठी साहित्यातील योगदान या विषयावरील परिसंवाद, भारुड,  जात्यावरच्या ओव्या, कथाकथन, लावणी व नृत्य गायन, नकला, गीतगायन, ग्रामदैवताचा छबिना, शोभेचे दारुकाम, सांस्कृतिक कार्यक्रम, दि. 12 रोजी ग्रामदैवताच्या परंपरागत शेरणीवाटपाचा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्वरुपात ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.    
    या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष प्राचार्य सुभाषराव नागटिळक, कार्याध्यक्ष दिनकर नागटिळक, कार्यवाह पंडितराव पाटील, निमंत्रक प्रतापराव नागळिक, आयोजक फुलचंद नागटिळक हे विशेष प्रयत्न करीत आहेत.
 
Top