उस्मानाबाद :- जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे, पण पाणी उपलब्ध नाही, अशी अपवादात्मक परिस्थिती उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी दिसून येते, अशा ठिकाणी जनावरांच्या छावण्या कार्यान्वित करण्याबाबत सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  तुळजापूर येथे सांगितले.
         उस्मानाबाद जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आणि त्यावरील उपाययोजनांचा मुख्यमंत्री चव्हाण यांनी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, आमदार ज्ञानराज चौगुले, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. ओमराजे निंबाळकर, आ. राहूल मोटे, आ. विक्रम काळे, तुळजापूर विकास  प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तर जिल्हाधिकारी  डॉ. के. एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
        जिल्ह्यात आजच्या परिस्थतीत  पुरेसा चारा उपलब्ध असला तरी काही भागात चारा आहे, पण पाणी नाही, अशी परिस्थिती असून तेथे चारा छावण्या कार्यान्वित करणे गरजेचे आहे, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी यंदा राज्यात असलेली परिस्थिती लक्षात घेवून सरकारने चारा छावण्याचे कांही  निकष शिथिल केले आहेत,असे नमूद करुन या जिल्ह्यातील अपवादात्मक परिस्थीती  लक्षात घेवून उपाय योजले जातील, असे सांगितले. जनावरांसाठी पाणी  पुरवठ्याबाबत शासनाने पूर्वीच सूचना दिल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
         जिल्ह्यात जेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो, अशा प्रत्येक खेड्यात टँकरचे पाणी विहीरीत नव्हे, तर टाकीत साठवले जाणे आवश्यक असून त्यासाठी लोकसहभागातून टाक्या उपलब्ध करुन घेतल्या जात आहेत, असेही नमूद करुन मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील किती खेडयांना किती टाक्या लागणार आहेत, याचा तपशिल आपल्याकडे पाठवला जावा, आपण विविध संस्थांशी बोलून जिल्ह्याची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करु असे सांगून जिल्ह्यातील उस्मानाबाद, उमरगा येथील पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीची माहिती घेवून मुख्यमंत्र्यांनी या योजनांमधून लवकर पाणीपुरवठा सुरु व्हावा, असे सांगितले.
          दुष्काळावरील कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी जलसंधारणाचे महत्व असून प्रत्येक खेड्यात जलसंधारणाचे काम व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिमेंट बंधा-यांमुळे परिसरातील पाणी पातळीत वाढ होत असल्याचा अनुभव येतो. बंधा-यांची कामे प्राधान्याने केली जावीत, असे ते म्हणाले.
          पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील परिस्थिती व त्यावरील उपायांची माहिती देताना जिल्ह्याचे विविध प्रश्न मांडले. तर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. ढोबळे यांनी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव लगोलग मंजूर केले जाणे आवश्यक आहे, असे सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील 731 गावांची आणेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे, विविध 213 सिंचन प्रकल्पात 2.6 दशलक्ष घनमिटर पाणी उपलब्ध आहे. सद्यस्थितीत नागरी व ग्रामीण भागात 205 टँकरने पाणीपुरवठा केला जात असून 432 गावांसाठी 839 विंधन विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत. विविध 103 प्रकल्पातील 50 लाख 30 हजार 558 घनमिटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे आणि 10 प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे संरक्षण करण्यासाठी त्यावर बाष्पीभवन रोधन रसायन टाकण्यात  आले आहे,अशी माहिती यावेळी  देण्यात आली.
       यावेळी अधिग्रहीत विंधन विहीरींचा वीज पुरवठा सुरु ठेवणे, विहीरींच्या कामांना गती देणे, मागणीप्रमाणे चारा छावण्या सुरु करणे, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेसाठी अंतरातील निकष शिथील करणे आदि मागण्या लोकप्रतिनिधींनी  मांडल्या.
 
Top