नळदुर्ग : किलज (ता. तुळजापूर) या गावातील चौकातील झेंडे काढण्‍यावरुन दोन गटात गेल्‍या काही दिवसापूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये, याकरीता प्रशासनाने वेळीच दखल घेऊन हस्‍तक्षेप करण्‍याची मागणी ग्रामस्‍थातून केली जात आहे.
    तुळजापूर तालुक्‍यातील किलज गावामध्ये छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज समर्थकांनी भगवा झेंडा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्थकांनी निळा झेंडा लावला होता. सदर दोन्ही झेंडे आपआपल्या समर्थकांनी काढावेत यासाठी किलज ग्रामपंचायतमध्ये दि. २६ जानेवारी २०१३ रोजी ग्रामसभा घेऊन व्यंकट नागनाथ शिंदे यांनी गावातील सदर झेंडे लावण्यासाठी ग्रामपंचायतीने नाहकरत प्रमाणपत्र किंवा परवाना देण्यात येऊ नये. संबंधित समर्थकांमध्ये वाद होऊन गावचा कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच संबंधित झेंडे समर्थकांनी आपआपले झेंडे तात्काळ काढून घ्यावेत जेणेकरुन जनहिताचे राहील. सदर झेंडे नाही काढल्यास पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. सदर विषयी ग्रामसभेमध्ये सविस्तर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सदर ठरावास प्रदिप शिंदे यांनी अनुमोदन दिले आहे. ग्रामपंचायतीच्या प्रोसिडींग बुकातील नोंदीवरुन दिसुन येते.
    उपरोक्त ठरावानुसार छत्रपती शिवाजी महाराज समर्थकांनी शिवाजी चौकात लावलेला भगवा झेंडा तात्काळ काढून गावात शांतता नांदण्यास सहकार्य केले. मात्र निळा झेंडा समर्थकांनी सदर चौकातील आपला निळा झेंडा आज दि. १४ मार्च २०१३ रोजी पर्यंत काढला नसल्याने गावातील छत्रपती शिवाजी महाराज समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण असुन भगवा झेंडा समर्थकांनी ग्रामपंचायतीमध्ये झेंडे काढण्याचा ठराव होऊनसुद्धा निळा झेंडा काढला नसल्याने दि. ८ मार्च २०१३ रोजी ग्रामपंचायतीस कुलूप ठोकले होते.
    सदर कुलूप दि. ११ मार्च २०१३ रोजी सामंजस्याची भूमिका घेऊन काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदर बाबीसंबंधी ग्रामसेवक कांबळे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व नळदुर्ग पोलिस स्टेशन यांनी दि. ८ मार्च २०१३ रोजी लेखी पत्र देऊन योग्य ती कार्यवाही करण्याविषयी अवगत केले असल्याचे सांगितले.
    मात्र पत्र देऊनही तात्काळ आठ दिवस झाले तरीही संबंधित वरिष्ठांकडून कसलीच कार्यवाही झाली नसल्याने किलज ग्रामस्थांमधुन तिव्र संताप व्यक्त होत आहे. वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करावी व गावात शांतता नांदावी यासाठी सुयोग्य तोडगा काढावा अशी मागणी नागरिकातुन होत आहे.
 
Top