सांगोला (राजेंद्र यादव) :-  दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ज्या ठिकाणी पाण्याच्या टँकरची मागणी आहे. त्या ठिकाणी तात्काळ टँकर सुरू करावेत, विहीर दुरूस्तीची कामे हाती घ्यावीत, शिरभावी योजनेच्या पाण्याचे नियोजन करावे, ग्रामसेवकांनी मजूरांच्या हाताला रोहयोतून कामे उपलब्ध करून द्यावीत. गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या दररोज भरल्या जातात की नाही? अशा सक्त सूचना आ. गणपतराव देशमुख यांनी आढावा बैठकीत दिल्या.पंचायत समितीच्या बचतभवन येथे शुक्रवारी सकाळी दुष्काळी परिस्थिती टंचाई निवारण, चारा, पाणी तसेच मजूरांच्या हाताला कामे आदी उपाययोजनांची अमंलबजावणी करण्यासाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत आ. देशमुख बोलत होते. या बैठकीस गटविकास अधिकारी राहुल गावडे, निवासी नायब तहसीलदार पी.ए. शेख, चंद्रकांत देशमुख, जि.प. सदस्य अशोक शिंदे, विमल बंडगर, कमल कोळेकर आदी उपस्थित होते.
         तालुक्यात सुरू असलेल्या 93 जनावरांच्या छावण्यात  छावण्यातून 11 हजार 178 लहान तर 93 हजार 705 मोठी अशी एकूण 1 लाख 4 हजार  883 जनावरे चारा, पाणी सुविधेचा लाभ घेत आहेत. पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर वाडीवस्तीवर 77 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार पी.ए. शेख यांनी दिली. विंधन विहीर दुरूस्तीसाठी 86 लाभार्थ्यांचे अर्ज आले असून 59 विंधन विहीरीच्या दुरुस्त्या केल्या आहेत. तर 94 नवीन विंधन विहीरींचा सर्वे पूर्ण झाला असून मंजूरीसाठी 21 प्रस्ताव पाठविले आहेत. आमदार फंडातून  विंधन विहीरी पूर्ण केल्या आहेत. 550 शेततळी मंजूर करण्यात आली असून विहीरींच्या 22 कामावर 104 मजूर रस्त्याच्या व इतर अशा 33 कामावर 209 मजूर काम करीत असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी अरूण जाधव यांनी दिली.
        छावण्यांचे फेब्रुवारी अखेर प्राप्त अनुदान लवकरच छावणीचालकांना अदा केले जाणार असून यापुढे छावणीची बिले त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन केले आहे. उहाळ्याच्या तीव्रतेमुळे जनावरांना निवार्‍यासाठी पत्राशेडची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी पशुपालकांतून होत आहे. मात्र, पत्राशेडची आवश्यकता नसल्याचे आ. देशमुख यांनी आढावा बैठकीत सांगितले.
 
Top