उस्मानाबाद :- दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलावातून लोकसहभागातून गाळ काढण्याच्या जिल्ह्यात सुरु असलेल्या मोहिमेचे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कौतूक केले. त्याचबरोबर टंचाई परिस्थिती असताना रोजगार हमी योजनेवरील मजूरांची उपस्थिती वाढण्याबाबत संबधित तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी दक्षता घ्यावी तसेच कामे सुरु करावीत,असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.
       उस्मानाबाद जिल्ह्यातील वाढीव उमरगा पाणीपुरवठा योजना,लोहारा तालुक्यातील समुद्राळ येथील तात्पुरती  पाणीपुरवठा योजना, बोरी येथील  धरणावर पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी केलेल्या इव्हलॉक उपाययोजना, हातलादेवी येथे उजनी पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील कामांची पाहणी केल्यानंतर श्री.जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी  कार्यालयात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरदिास, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी व शोभा ठाकूर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. एस. भालेराव यांच्यासह नगर पालिकांचे मुख्याधिकारी, आठही तालुक्यांचे तहसीलदार,गटविकास अधिकारी  आदींची उपस्थिती होती.
    यावेळी जयस्वाल यांनी जिल्ह्यातील विहीर व विंधन विहीर अधिग्रहण, टँकरने होणारा पाणीपुरवठा,ग्रामीण व नागरी भागातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती,त्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या उपाय योजना आदिंची माहिती घेतली. विहीर खोलीकरण आणि गाळ काढण्याबाबत शासनाने विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या वित्तीय अधिकारात वाढ केली असल्याचे सांगून ते म्हणाले की,सध्या अजुनही रोजगार हमी योजनेवर मजूरांची उपस्थिती पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही. कामांचे नियेाजन केले असताना ही संख्या वाढणे अपेक्षित असून रोजगार हमी योजनेच्या कामांना गती दयावी आणि त्यादृष्टीने संबंधित  तहसीलदार तसेच  गटविकास अधिकारी  यांनी  लक्ष दयावे. येत्या काही दिवसात या कामांची संख्या व मजूरांची संख्या यात वाढ होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    जिल्ह्यात 116 प्रकल्पांमधून आतापर्यंत तब्बल 73 लाख घनमीटर एवढा गाळ उपसला गेला आहे. लोकसहभागातून सुरु असलेल्या या मोहिमेचे त्यांनी कौतूक केले. याचबरोबर तेरणा धरण बुडीत क्षेत्रात चर घेवून तेथून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा उपयोग होत आहे. त्याचप्रमाणे नरेगामधून इतर धरण बुडीत क्षेत्रात अशा प्रकारे चर घेवून पाणी उपलब्ध होते काय याचीही  चाचपणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हीर व विंधनविहीर अधिग्रहणाबाबत संबधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी,असेही निर्देशही  जयस्वाल यांनी दिले.
    बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी  नागरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची सध्यस्थिती, केल्या जात असलेल्या उपाययोजना, पाणीटंचाई निवारणार्थ केल्या जात असलेल्या कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यता आदिंची माहिती दिली. याचबरोबर उस्मानाबाद शहरात टँकरव्दारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत वाहतूक नियमन आणि त्यासाठी तलाठ्यांची केलेली  नियुक्ती याबाबतही माहिती दिली. टँकरने होणा-या पाणीपुरवठाबाबत तपासणी होणे गरजेचे असल्याचे यावेळी श्री. जयस्वाल यांनी सांगितले.    
 
Top