नवी दिल्ली -: सरबजितसिंगच्या मृत्यूनंतर त्यांची बहिण दलबीर कौर गुरुवारी ११ वाजता मीडियासमोर आल्या आहेत. बुधवारी पाकिस्तानातून परतल्यानंतर भारत सरकारवर संतप्त असलेल्या दलबीर यांचा आजचा पवित्रा बदलेला दिसला. त्या म्हणाल्या माझा भाऊ देशासाठी शहिद झाला आहे. देशातील हिंदू, शिख, मुस्लिम, ख्रिश्चन नागरिकांनी आणि सर्व राजकीय पक्षांनी आता एकत्र होऊन पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे.
      पाकिस्तानने मनमोहनसिंगाच्या पाठीत खंजीर खूपसल्याचे सांगत त्या म्हणाल्या, पहिले मुशर्रफ यांनी वाजपेयींच्या पाठीत खंजीर खूपसला आता झरदारींनी मनमोहनसिंगासोबतही तेच केले आहे. या क्षणाला देशातील सर्व नागरिकांनी सर्व भेद विसरून पंतप्रधान मनमोहनसिंग आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
     दलबीर कौर यांनी पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्ते अंन्सारी बर्नी यांच्या हेतूबद्दलही शंका उपस्थित केल्या आहेत. त्या म्हणाल्या, अंन्सारीने सरबजितच्या सुटकेसाठी त्यांच्याकडे 25 कोटी रुपयांची मागणी केली होती. सकाळी पैसे द्या आणि सायंकाळी सरबजितला घेऊन जा, असे अंन्सारी म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. एवढी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर त्याने किमान दोन कोटी तरी द्या, असे म्हटले होते. दलबीर कौर यांनी 25 कोटी रुपयांच्या मागणीचा आरोप प्रथमच केला आहे.
    सरबजित भारतीय असल्यामुळेच त्याच्यावर आरोप करण्यात आले, असे दलबीर कौर म्हणाल्या. पाकिस्तानात निवडणूका आहेत त्यामुळेच पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांनी माझ्या भावाची हत्या केली. असा आरोप त्यांनी केली. त्या म्हणाल्या, 2005 पासून मी सांगत आहे की, माझा भाऊ निरपराध आहे. निर्दोष व्यक्तीला शिक्षा होत नाही तर त्याची हत्या केली जाते. मात्र, माझे कोणीही ऐकले नाही. आधी चमेलसिंगची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणीही आवाज उठवला नाही, त्यामुळे सरबजितलाही मारण्यात आले. त्याच्या मृत्यूबद्दल पाकिस्तानने भारताची दिशाभूल केली आहे.  दलबीर कौर यांनी आरोप केला की, जिन्न हॉस्पिटलच्या डॉक्टरांना मी जेव्हा सरबजितच्या प्रकृतीबद्दल विचारत असे तेव्हा ते केवळ हसत होते. कारण त्यांना माहित होते की, त्याचा मृत्यू झाला आहे.

(* साभार - दिव्‍यमराठी)
 
Top