जळगाव -: विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल (वय 34) याने बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कोथळी येथील राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दि. 2 मे रोजी दुपारी 2 वाजता मुक्ताईनगर जवळील कोथळी येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
      एकनाथ खडसे यांचा निखिल हा धाकटा मुलगा होता. त्याच्या दोन्ही मोठ्या बहिणी विवाहित असून, एक लंडन येथे तर दुसरी पुण्याला असते. निखिलची पत्नी रक्षा खडसे जिल्हा परिषदेत आरोग्य सभापती आहेत. त्याला दोन मुले आहेत. निखिल गेल्या काही वर्षांपासून पाठीच्या दुखण्याने आजारी होता. मागच्या जिल्हा परिषदेत तो भाजपतर्फे निवडून आला होता. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षपदही तो भूषवित होता.
     मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपासून निखिल बाहेर होता. दुपारी आपल्या इनोव्हा कारने तो ‘मुक्ताई’ या आपल्या घरी परतला. त्या वेळी घरात त्याची आई मंदाताई आणि पत्नी रक्षा हजर होत्या. एकनाथ खडसे जुन्या गावात एका ग्रामपंचायत सदस्याकडे लग्नाला गेले होते. घरी आल्यावर निखिल वरच्या मजल्यावर असलेल्या शयनकक्षात गेला. काही वेळातच बेडरूममधून गोळीबाराचा आवाज झाला. त्यामुळे सर्व कुटुंबीय त्याच्या रूमकडे धावले.  तेव्हा निखिल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याने स्वत:च्या 9 एमएम रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात  गोळी झाडून घेतली होती. ही माहिती तातडीने एकनाथ खडसे यांना कळविण्यात आली. त्यामुळे ते लगेचच घरी आले. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रुग्णवाहिका घेऊन तिथे दाखल झाले. त्यानंतर निखिलला तातडीने जळगावकडे रवाना करण्यात आले.

मुख्यमंत्री आणि नेत्यांच्या उपस्थितीत आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार
प्रयत्न ठरले अपयशी
    निखिलला घेऊन रुग्णवाहिका गोदावरी हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा डॉ. उल्हास पाटील व डॉ. संजीव हुजुरबाजार यांच्यासह टीम तयार होती. विद्युत धक्के देऊन त्याचे हृदय सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण त्या प्रयत्नांचा उपयोग होऊ शकला नाही.

गोळीने भेदला मेंदू
    डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार निखिलने उजव्या कानाच्या दोन इंचावर रिव्हॉल्व्हर टेकवून गोळी झाडली आहे. त्यामुळे तिथे सहा इंच व्यासाचे छिद्र करून गोळी मेंदूत शिरली आणि तिथे ती फुटली. त्यामुळे त्याचा मेंदू आतल्या आत छिन्नविछिन्न झाला होता. त्यामुळे मोठा रक्तस्राव होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला असावा, असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे.

राजकीय कारकीर्द ठरली अल्पजीवी
       निखिल मागच्या जिल्हा परिषदेत भाजपतर्फे सदस्य म्हणून निवडून आला होता. ऑक्टोबर 2009 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने त्याला उमेदवारी दिली होती. मात्र, अपक्ष उमेदवार मनीष जैन यांनी त्याचा पराभव केला होता. यावेळी कोथळी गट महिला राखीव झाल्याने त्याची पत्नी रक्षा खडसे या त्या गटातून निवडून आल्या आणि आरोग्य सभापती बनल्या आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षपदही त्याला सोपविण्यात आले होते. त्या निमित्ताने युवा कार्यकर्त्यांशी त्याचा संपर्क येत होता. मात्र, वैयक्तिक जीवनात त्याला फारसे मित्र नव्हते. गेल्या काही वर्षांपासून तो पाठ आणि मानेच्या दुखण्याने आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू होते.

नेते आणि हेलिपॅड
    निखिलच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह भाजपचे नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, भाऊसाहेब फुंडकर हे उपस्थित राहातील, असे भाजपचे विभागीय सहसंघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक नेते हेलिकॉप्टरने येणार असल्याने हेलिपॅड बनविण्याचे काम कोथळी येथे रात्रीच सुरू करण्यात आले होते.

सेनेची सभा अनिश्चित
      शिवसेनेचे कार्यकारीप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा 4 मे रोजी होईल, असे जाहीर झाले आहे. मात्र, एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असल्याने या सभेबाबत अनिश्चितता वाढली आहे. यासंदर्भातला निर्णय शुक्रवारी होईल, असे उपनेते गुलाबराव पाटील यांनी रात्री स्पष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे 4 मे रोजी जळगावात येतील आणि मुक्ताईनगर येथे जाऊन खडसे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करतील, अशी शक्यता आहे.
 
कुटुंबीयांना प्रचंड धक्का
     निखिलच्या या अनपेक्षित कृत्याने खडसे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच एकनाथ खडसे यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक बोलावून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रात्री त्यांना बरे वाटत असल्याचे नातलगांकडून सांगण्यात आले. सौ. मंदाताईही एकुलत्या मुलाच्या या कृत्याने बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. दोघांचाही रक्तदाब वाढला असून आपण त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याने घरीच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत, असे डॉ. आर.ओ. कदम यांनी सांगितले.

रिव्हॉल्व्हर, कपडे जप्त
     निखिलने ‘लाम्बा’ कंपनीच्या 9 एमएमच्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेतली. ती रिव्हॉल्व्हर, काडतुसाची पुंगळी आणि रक्ताळलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यानंतर ती रूम सील करण्यात आली. रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येणार होती.

कोथळी येथे होणार अंत्यसंस्कार
     मृत घोषित केल्यावर निखिलचा मृतदेह गोदावरी हॉस्पिटलमधून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. रात्री 8.14 वाजता शवविच्छेदन सुरू झाले. त्यानंतर पुन्हा गोदावरी रुग्णालयात नेऊन मृतदेहावर रासायनिक क्रिया करण्यात आली. गुरुवारी दुपारी 2 वाजता कोथळी येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

(* साभार - दिव्यमराठी)
 
Top