उस्मानाबाद -: पाणी टंचाई उपाययोजनांची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना, प्रसारमाध्यमे यांनीही यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. जिल्हा प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना यामुळे निश्चितच बळ मिळत आहे. संकटाच्या वेळी सर्वांनी एकत्र येणे आणि आगामी काळात अशा प्रकारची संकटे निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करणे, हीच आजची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सय व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी केले.
     महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री ना. चव्हाण यांच्या हस्ते येथील पोलीस संचलन मैदानावर पार पडला. त्यावेळी मानवंदना स्विकारल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
     आपल्या भाषणात पालकमंत्री चव्हाण यांनी सध्याच्या टंचाई परिस्थितीत जिल्हा प्रशासन टंचाई उपाययोजनांसाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जिल्ह्यातील 731 गावे टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या 247 टँकरद्वारे पाणीपुरवठा  करण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागात आतापर्यंत नळयोजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, विंधन विहीरींची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीरी घेणे या योजनांवर आतापर्यंत 20 कोटी 45 लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे. जूनअखेरपर्यंतच्या 88 कोटी 22 लाख रुपयांच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
     राज्य शासनाने उस्मानाबाद आणि उमरगा या दोन्ही शहरांसाठीच्या पाणीपुरवठा योजनांना निधी उपलब्ध करुन दिल्याने येथील  पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाल्याचे सांगून श्री.चव्हाण यांनी पाणीपुरवठा व चारा टंचाई उपाययोजना अंतर्गत जिल्ह्याला आतापर्यंत 67 कोटी 98 लाख रुपये प्राप्त झाल्याचे नमूद केले.
       जिल्ह्यात सध्या 21 छावण्या कार्यान्वित झाल्या असून त्यासाठी 507 लाख 66 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत तर चारा छावण्यातील जनावरांच्या संख्येबाबतही अनुकूल निर्णय राज्य स्तरावर घेण्यात आला. पाणीटंचाई उपाययोजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी विविध निर्णय शासनाने घेतले असे ते म्हणाले.             
     कोरड्या पडलेल्या पाटबंधारे प्रकल्पातून लोकसहभागातून तब्बल 1 कोटी 9 लाख घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला. यामुळे जमिनीची सुपीकता वाढून प्रकल्पाच्या सिंचन साठ्यातही वाढ होणार आहे असे सांगून अधिकाधिक शेतक-यांनी यासाठी पुढे यावे, असे त्यांनी आवाहन केले.
    वैरण विकास कार्यक्रमामुळे  जिल्ह्यात 92 हजार मेट्रीक टन अतिरिक्त चारा उपलब्ध झाल्याने चारा टंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली. टंचाईग्रस्त गावातील पाणीटंचाईमुळे सुकत चाललेल्या फळबागांना अनुदान वाटपासाठी कृषी विभागाकडे 12 कोटी 18 लाख रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे. त्याचे वाटप तालुका कृषी कार्यालयामार्फत करण्यात येत असल्याचेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले. 
     शेततळे, नाला सरळीकरण, सिंमेट नाला बंधारे, कंपार्टमेंट बंडिंगची कामे आपण हाती घेतली आहेत. पाझर तलाव दुरुस्तीची कामे सुरु आहेत. सूक्ष्म पाणलोट पथदर्शी कार्यक्रम राबविण्यासाठी आपल्या जिल्ह्याची निवड झाली आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी आपण  3 कोटी 45 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे ते म्हणाले.
रोजगार हमी योजनेत  मागेल त्याला काम  उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण असून त्यासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.   
         पाणीटंचाईच्या  अतिशय कठीण परिस्थितीतही कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून जिल्ह्यातील जनतेने संकटावर मात करण्याचा केलेला एकत्रित प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे ना.   चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.  
     पालकमंत्री चव्हाण यांच्याहस्ते यावेळी जिल्हा उद्योग पुरस्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कार, आदर्श तलाठी पुरस्कार आदिंचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
      त्यांनतर पालकमंत्री यांनी परेडची पाहणी केली. परेडचे नेतृत्व सहायक पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी केले. या संचलनात पोलीसांचे महिला व पुरुषांचे पथक, होमगार्डचे महिला व पुरुषांचे पथक, पोलीस बॅन्ड पथक आदि सहभागी झाले होते. यावेळी पोलीस श्वान पथक, वज्रवाहन, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान पथक, दंगल नियंत्रण पथक, जिल्हा रुग्णालय, कृषी विभाग, आरोग्य विभाग, जलद प्रतिसाद पथक, शिक्षण विभाग आणि अग्निशामक दलाचे चित्ररथ सहभागी झाले होते.
         या समारंभास आमदार राणाजगजितसिंह पाटील, जि.प.अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जि.प.च्या विविध विषय समित्यांचे सभापती, पदाधिकारी, पंचायत समिती सभापती व पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, वरिष्ठ अधिकारी, पत्रकार तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.       
 
Top