उस्मानाबाद -: बलशाली भारत बनविण्यासाठी सुदृढ बालक असणे आवश्यक आहे.त्यामुळे बालकांचे कुपोषण होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कुपोषण निर्मुलनासाठी  शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी केले.
    राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतंर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा जिल्ह्यात पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते शिंगोली ता. उस्मानाबाद येथील अंगणवाडी केंद्रात शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, जिल्हाधिकारी डॉ. के.एम.नागरगोजे, जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हजारे, महिला व बालकल्याण सभापती सविता कोरे, पंचायत समिती सभापती प्रेमलता लोखंडे, अप्पासाहेब पाटील, उपमुख्य कार्यकारी  अधिकारी एस.डी. पाटील, गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी  मोरे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
    ना. चव्हाण म्हणाले की, आजचा बालक हा या देशाचा भावी नागरिक असतो. त्याचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कुपोषण निर्मुलनासाठी शासन प्रयत्न करत आहे. गाव पातळीवर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन आपण हे उदिृष्ट साध्य करु शकतो. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
    डॉ. व्हट्टे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुपोषण निर्मुलनाच्या कार्यक्रमाला अधिक वेग दिला जाईल,असे सांगितले. श्री. दुधगावकर यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. श्रीमती कोरे यांनीही आपले विचार मांडले.
    प्रास्ताविकात उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची माहिती दिली. यानुसार जिल्ह्यात या कार्यक्रमातंर्गत 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची वर्षातून दोन वेळेस तर 6 ते 18 वर्षे वयोगटातील 1 वेळेस तपासणी करण्यात येणार आहे. बालमृत्यू कमी करणे, मोफत आरोग्य तपासणी व उपचार, कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करणे, विद्यार्थ्यांना वैयक्तीक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत तपासणी अभिलेख जतन करुन ठेवणे आदि कामे केली जाणार आहेत.
 
Top