बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी नगरपरिषदेच्‍या कोट्यावधी रुपयांचा खर्च करुन स्‍व. यशवंतराव चव्‍हाण सांस्‍कृतिक सभागृह बांधण्‍यात आले. हे सभागृहत वापरासाठी जादा कर्मचारी व देखभाल दुरूस्‍तीसाठी प्रचंड खर्च होणार असल्‍याची चुकीची माहिती दाखवून प्रशासनाची दिशाभूल केली. ठेकेदारांचे हितसंबंध जोपासले व वापरा आणि हस्‍तांतरीत करा, या धोरणावर नाममात्र दरात सभागृह चालविण्‍यास दिले. सदरच्‍या ठरावास आमचा विरोध होता. यामध्‍ये बार्शी नगरपरिषदेचे प्रचंड नुकसान झाले असून याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक महेदीमियॉं लांडगे यांनी जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे दिलेल्‍या तक्रारीत केली आहे.
    दिलेल्‍या तक्रारीसोबत पुराव्‍यासाठी नऊ कागदपत्रे जोडण्‍यात आली असून सदरच्‍या ठिकाणी बेकायदेशीरपणे हॉटेल सुरु आहे. याद्वारे ठेकेदार वरचेवर आथ्रिक कमाई करीत असून नगरपरिषदेची फसवणूक होत आहे. सभागृहातील कामगारांचा व्‍यवसाय कर भरण्‍यात आला नाही, तिकीट विक्री परवाना नसताना त्‍याची बेकायदा विक्री केली जाते, असेही तक्रारीत म्‍हटले आहे.
    सदरच्‍या घटनेबाबत राष्‍ट्रवादीचे गटनेते नागेश अक्‍कलकोटे यांनी यामध्‍ये राजकीय विरोधासाठी विरोध असल्‍याचे सांगत, सदरच्‍या ठेक्‍यासाठी वृत्‍तपत्रात प्रसिध्‍दीकरण करण्‍यात आले होते. सांस्‍कृतिक सभागृह हे कमाईचे माध्‍यम नसून शहराची सांस्‍कृतिक चळवळ पुढे नेण्‍यासाठी व बार्शीकर रसिकांची करमणुकीची सोय करण्‍यासाठी आहे. कमाई करायची असती तर सदर सभागृहात खासगी विवाह सोहळे व राजकीय सभा समारंभही आयोजित करत भरमसाठ भाडे आकारता येऊ शकले असते. मात्र ते नगरपरिषदेने टाळल्‍याचे सांगितले. विरोधी पक्षाने आजपर्यंत जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे अपिल केली परंतु जिल्‍हाधिकारी यांना त्‍यात तथ्‍य आढळले नसल्‍याने निकाल त्‍यांच्‍याविरूद्धच लागत होते. त्‍याप्रमाणे याचाही निकाल लागेल.
 
Top