बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शैव वैष्‍णवांचे माहेरघर असलेल्‍या बार्शीतील शतकानुशतके धार्मिक परंपरा जतन केल्‍याचे दिसून येते. श्री भगवंताचा अवतार व एकमेव मंदिर, शिवाचा अवतावर व उत्‍तरेश्‍वर मंदिर, बारा मठ, बारा ज्‍योतिर्लिंग, बारा तीर्थे, बारा शिवा, द्वादशीचे महत्‍व बारस नावाच्‍या राजाचा, भक्‍त अंबरिषाची महती सांगणा-या बार्शीतच श्री संत प्रल्‍हाद भाऊ साहेब महाराज यांचेही मंदिर आहे.
    श्री विष्‍णूचे भक्‍त असलेल्‍या संत प्रल्‍हाद भाऊसाहेब बुवांनी सुमारे 251 वर्षापूर्वी महाद्वार चौक येथील मठात समाधी घेतली. तेंव्‍हापासून अखंडपणे मित्‍तीनुसार वैशाख वद्य दशमी ते चतुर्दशीपर्यंत पुण्‍यतिथी उत्‍सवाचे आयोजन केले जात आहे. या ठिकाणी श्री विठ्ठल रूक्मिणीचे सुंदर मंदीर असून मोठ्या गाभा-यात संत प्रल्‍हार बुवांचा पंचधातूचा मुखवटा दर्शनासाठी ठेवण्‍यात आला आहे.
    परंपरेनुसार दशमीच्‍या दिवशी पंचायत समितीच्‍या जवळील श्री खंडोबा मंदिरापासून रासनकर महाराज यांना आमंत्रण देवून मठातील पुण्‍यतिथी सोहळा पार पाडला जातो. मंदिरात किर्तन, जागर, भजन, काकडा आरती, प्रसाद इत्‍यादी कार्यक्रम पार पाडले जातात. दशमी दिवशी किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होते. सायंकाळी पाच ते सात वाजता संत प्रल्‍हाद भाऊसाहेब यांची परंपरागत रथातून मिरवणूक निघते. सदरची मिरवणूक महाद्वार चौक, पटेल चौक, लोखंड गल्‍ली, तुळशीराम रोड, दाणे गल्‍ली, किराणा रोड, नवी जुनी चाटी गल्‍ली मार्गे मंदिराकडे आणली जाते. कोणतेही यंत्र या रथाला लावण्‍यात येत नसून भक्‍तच या रथाला अत्‍यंत भक्तिमय वातावरणात ओढून नेतात. प्रल्‍हाद बुवांच्‍या मुखवट्याचे दर्शन अनेक भाविक यावेळी घेतात. त्रयोदशीचा मुख्‍य दिवस हा पुण्‍यतिथीचा दिवस आहे. या दिवशी समाधीस अभिषेक, महानैवेद्य, भोजन प्रसाद इत्‍यादी कार्यक्रम केले जातात. चतुर्दशी दिवशी गोपाळकाल्‍याचे किर्तन होते. दुपारी चार वाजता रथाच्‍या मार्गे पालखी उत्‍सवाची सांगता होते.
 
Top