सर्वाधिक काळ महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्रीपद भुषविणारे दिवंगत मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांच्‍या कारकिर्दीचा गौरवाने उल्‍लेख केला जातो. त्‍यांच्‍या कारकिर्दीत घडलेल्‍या धवलक्रांती आणि हरितक्रांतीने राज्‍यातील शेतकरी आणि शेतीशी संबंधितांचे अवघचे जीवनच बदलले. त्‍यांनी शेती क्षेत्रात घडविलेल्‍या बदलांची फळे आपण आजही चाखत आहोत. आधुनिक राहणीमुळे प्रसिध्‍द असलेले वसंतराव नाईक त्‍यांच्‍या ऐतिहासिक निर्णयांसाठीही कायमचे स्‍मरणात राहतील. सोमवार दि. 1 जुलै रोजी त्‍यांची 100 वी जयंती साजरी होत असून त्‍यांच्‍या जयंतीनिमित्‍तांना विशेष लेख....
    बंद गळ्याचा कोट, तोंडात चिरुट, चमकदार सोनेरी चष्‍मा, शिकारीची आवड अशा प्रकारे बाहेरुन आधुनिक वाटणा-या माजी दिवंगत मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांचे व्‍यक्‍तीमत्‍त्‍व विचाराने आणि कृतीने मात्र पुर्णतः मराठमोळे होते. शेती आणि शेतकरी, ग्रामीण भागातील महत्‍त्‍वाचे प्रश्‍न हा त्‍यांच्‍या सततच्‍या चिंतनाचा आणि जिव्‍हाळ्याचा विषय होता. नागपूरच्‍या मॉरिस महाविद्यालयातून पदवी प्राप्‍त केल्‍यानंतर त्‍यांनी कायद्याचीही पदवी मिळविली. बंजारा समाजातील पहिले वकील असा त्‍यांचा लौकिक होता. डॉ. पंजाबराव देशुख यांच्‍यासारख्‍या नामवंत कायदे पंडिताच्‍या हाताखाली त्‍यानी वकिली सुरु केली. मात्र केवळ वकिलीत अडकून न राहता त्‍यांनी स्‍वतःच्‍या बंजारा समाजामध्‍ये सुधारणा केली. इथूनच त्‍यांच्‍या सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. यानंतर पुसर नगरपालिकेचे अध्‍यक्ष, आमदार, उपमंत्री, मंत्री आणि त्‍यानंतर मुख्‍यमंत्री अशी त्‍यांची कारकीर्द उत्‍तरोत्‍तर वृध्‍दीगंत होत गेली. ग्रामीण भागातील हा नेता महाराष्‍ट्रात सर्वाधिक काळ मुख्‍यमंत्री पदावर राहिला, याचे श्रेय त्‍यांचा प्रामाणिकपणा, लोकप्रियता आणि कामावरील निष्‍ठा यालाच द्यावे लागेल.
    नागरपूरच्‍या नील सिटी हायस्‍कूलमधून वसंतरावांनी मॅट्रीक उत्‍तीर्ण केले. याच काळात त्‍यांना वाचनाची आवड निर्माण झाली. त्‍यांनी हरीभाऊ आपटे आणि नाथमाधव अशा कादंबरीकारांच्‍या साहित्‍यकृतींचे वाचन केले. या दोन साहित्‍यकारांसोबतच महात्‍मा फुले, साने गुरुजी यांच्‍या विचार व साहित्‍याचा पगडा वसंतरावांवर होता. अस्‍पृश्‍यता निवारण, स्‍त्री शिक्षण, समाजजागृती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक लढा त्‍याचबरोबर महात्‍मा फुले, डॉ. आंबेडकर आणि डेल कार्नेजी यांच्‍या आचार-विचार आणि कार्याचा त्‍यांच्‍यावर प्रभाव पडला. यामुळे त्‍यांच्‍या मनात सामाजिक कार्याची प्रेरणा रुजली.
    एकीकडे सामाजिक, राजकीय कार्य तर दुसरीकडे शेती आणि शेतकरी हे त्‍यांच्‍या केवळ जिव्‍हाळ्याचे नव्‍हे तर अभ्‍यासाचेही विषय होते. शेतीच्‍या जिज्ञासेपोटी त्‍यांनी तालुक्‍यातील शेतीत अनेक सुधारणा घडवून आणल्‍या. महाराष्‍ट्राच्‍या आर्थिक, कृषी, औद्योगिक, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रावर स्‍वतःचा असा ठसा उमटविणारा हा नेता या राज्‍याचा सर्वात जास्‍त काळ मुख्‍यमंत्री होता. खंड न पाहता मुख्‍यमंत्री पदावर सलग अकरा वर्षापेक्षा अधिक काळ हा मान त्‍यांच्‍या लोकप्रियतेमुळेच मिळू शकला.
    वसंतरावांनी आपल्‍या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक महत्‍त्‍वाचे निर्णय घेतले. या ठाम निर्णयांनतूच राज्‍याला विकासाची भक्‍कम दिशा देण्‍याची भूमिका त्‍यांनी पार पाडली. त्‍यांनी शेती आणि शेतक-यांचे प्रश्‍न, समस्‍या यांना सर्वाधिक प्राधान्‍य‍ दिले. राज्‍यात मोठ्या प्रमाणात घेतल्‍या जाणा-या कापूस, ज्‍वारी, भात या पिकांची खरेदी एकाधिकार पध्‍दतीने खरेदी करण्‍याचा निर्णय घेतला त्‍यांची अंमलबजावणीही केली. दुधाबाबत परावलंबी असलेल्‍या राज्‍याला त्‍यांनी दूध उत्‍पादनात अग्रेसर केले. सं‍करित गायी खरेदी करुन दुग्‍ध उत्‍पादन वाढविण्‍यासाठी शेतक-यांना बँकांच्‍या माध्‍यमातून कर्जपुरवठा करण्‍याची व्‍यवस्‍था केली. त्‍यामुळे हरितक्रांती प्रमाणेच धवलक्रांतीचे रेयही वसंतरावांनच द्यावे लागेल.
    आज देशभरात राबविली जाणारी आणि गोरगरीबांच्‍या, गरजूंच्‍या हाताला निश्चितपणे काम देणारी व लोकप्रिय ठरलेली रोजगार हमी योजना वसंतरावांच्‍याच कार्यकाळात सुरु झाली. त्‍यांच्‍या काळत या योजनेतून असंख्‍य विहीरी, तलाव खोदले गेले. गावागावात पोहचणारे रस्‍ते निर्माण झाले. या 'ग्रास रुट' च्‍या योजना राबविताना पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळावी, कृषी उत्‍पादनाच्‍या बाबतीत प्रगत राष्‍ट्रांशी स्‍पर्धा करण्‍यासाठी शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि पीक पध्‍दतीची माहिती मिळावी, यासाठी राज्‍यात चार कृषी विद्यापिठांची स्‍थापना केली, हे केवळ वसंतरावांच्‍या कृषीविषयक ध्‍ेययधोरणांमुळेच घडू शकले.
    मराठवाड्यामधील पैठण येथे राज्‍यातील पहिले खुले कारागृह सुरु करणा-या वसंतरावांची दृष्‍टी किती आधुनिक होती, हे दिसून येते. मटका, जुगार आदी प्रकारांना आळा बसावा, यासाठी त्‍यांची राज्‍य शासनाची लॉटरी सुरु केली. वसंतरावांनी 14 फेब्रुवारी 1964 रोजीच मराठी ही राज्‍याची राज्‍यभाषा राहील, असा महत्‍त्‍वपूर्ण निर्णय घेतला. त्‍यानंतर 1965 मध्‍ये 'पुढच्‍या दोन वर्षात महाराष्‍ट्र अन्‍नधान्‍याच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या', असे त्‍यांनी जाहीररित्‍या सांगितले. त्‍यांच्‍या या वाक्‍याप्रमाणे त्‍यांनी बरोबर दोन वर्षात राज्‍याला अन्‍नधान्‍याच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण करुन दाखविले. अशी ही प्रातिनिधिक उदाहरणे असली तरी राज्‍याच्‍या एकूण प्रगतीच्‍या दृष्‍टीनं त्‍यांची कामगिरी खूपच महत्‍त्‍वाची आहे.
    आपल्‍या प्रदीर्घ कारकिर्दीत त्‍यांनी राज्‍याचा चेहरामोहराच बदलून टाकला. शेती, महसूल, राज्‍यभाषा, दारुविक्री, सरकारी यंत्रणेला कार्यप्रवण करणे यासोबतच अवर्षण, दुष्‍काळ या नैसर्गिक आपत्‍तींवर मात करण्‍यासाठी त्‍यांनी कठोर परिश्रम घेतले. मुख्‍यमंत्री म्‍हणून वसंतरावांनी जी छाप सोडली, तीच छाप त्‍यांनी संसदेत खासदार म्‍हणूनही सोडली. अत्‍यंत सौजन्‍यशील, नम्र, सुसंस्‍कृत, शांत स्‍वभावाचा हसतमुख नेता म्‍हणून त्‍यांचा लौकिक होता. त्‍यांच्‍या याच गुणांवर त्‍यांनी इंदिरा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री या जेष्‍ठ नेत्‍यांबरोबरचे अत्‍तम संबंध निर्माण झाले होते. आधुनिक पेहराव आणि राहणीमान असलेला, पण ख-या अर्थाने शेतक-यांचा कैवारी असलेला असा हा नेता होता. त्‍यांनी आखून दिलेल्‍या मार्गावरुनच महाराष्‍ट्राची मार्गक्रमणा सुरु आहे.

साभार : लोकराज्‍य
शब्‍दांकन : सतिश लळीत
 
Top