मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, बुलढाणा तसेच जळगाव जामोद तालुक्यांमधील खारपाण पट्ट्यातील 140 गावांची 18.42 कोटी रुपयांची लोकवर्गणी माफ करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
    मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नांदुरा, बुलढाणा, जळगाव जामोद तालुक्यांच्या खारपाण पट्ट्यातील 140 गावांच्या पाणीपुरवठ्याबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस बुलढाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सर्वश्री संजय कुटे, विजयराज शिंदे, चैनसुख संचेती, वित्त विभागाचे प्रधान सचिव डॉ.क्षत्रपती शिवाजी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संधू, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजीप्रा) सदस्य सचिव राधेश्याम मोपलवार, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर आदी उपस्थित होते.
    यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, या 140 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मजीप्राची 16.82 कोटी रुपयांची तर ग्रामपंचायतींची 1 कोटी 60 लाख रुपयांची लोकवर्गणी माफ करण्यात येणार आहे. या गावांना वाण धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी आरक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभाग तातडीनं संमत करेल. खारपाण पट्ट्यातील गावे नकाशावर दर्शविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
    बुलढाणा वाढीव पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत वित्त पुरवठा करण्यासाठी विशेष बाब म्हणून नगरपरिषदेचा हिस्सा 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे आणला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
 
Top