बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: मागील अनेक वर्षापासून बार्शी येथील कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या आवारात वाळूचे साठे असून त्‍याबाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे.
    बार्शी कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या परिसरात पश्चिमेकडील बाजूला व खार विभागाच्‍या कंपौंड वॉल लगज मोठ्याप्रमाणात वाळू साठा आहे. हा साठा नियमितपणे कमी होतो व रात्रीतून या ठिकाणी पुन्‍हा मोठ्याप्रमाणात वाळू आणून टाकली जाते. सदरच्‍या वाळू साठ्याचा मालक कोण, याची चौकशी आजूबाजूच्‍या दुकानदारांकडे केली असता कानावर हात ठेवले जात आहे.
    याबाबत कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचा व्‍यवहार पाहणारे उपसभापती कुंडलिक गायकवाड यांना सदरच्‍या प्रकाराची माहिती विचारली असता, मला याबाबत माहिती नाही, मी चौकशी करतो, सदरच्‍या बाबत साहेब कोणाला तरी बोलले असतील त्‍याशिवाय कोणी टाकणार नाही, त्‍यांच्‍या परवानगी शिवाय कोणीही टाकणार नाही, असे सांगण्‍यात आले. परंतु वस्‍तुस्थिती पाहता साहेब हे दिवाळीच्‍या पाडव्‍या शिवाय सदरच्‍या आवारात फिरकत नसून त्‍यांना सदरच्‍या प्रकाराबाबत किंचीतही कल्‍पना नसणार आहे, असे आजूबाजूने जाणा-या दुकानदारांचे व शेतक-यांनी सांगितले.
    सदरच्‍या प्रकाराबाबत एका कार्यकर्त्‍याने महसूल विभागात तक्रार दाखल केली होती, परंतु त्‍याची कसलीही दखल घेतली न गेल्‍याने याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. वाळूचे भाव गगनाला भिडले असताना मात्र बार्शीत यासारखे अनेक अवैध साठे होत असल्‍याने त्‍याची गंभीर दखल घेवून पक्ष विरहीत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.
 
Top