नळदुर्ग (प्रतिनिधी) -: अन्न व औषध प्रशासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या दुपारी एक पर्यंत सर्व औषधी दुकाने बंद आंदोलनाला नळदुर्ग व परिसरातील औषध दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तर रुग्णांची गैरसोय होताना दिसून आली.
    फार्मासिस्ट पूर्ण वेळ हजर पाहिजे, फक्त एमबीबीएस डॉक्टरांच्या चिठठीवरच औषधे दयावीत या व अशा अनेक कारणांनी राज्य केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात एक महिन्यांपासून संघर्ष चालू आहे. या संदर्भात अनेक बैठका झाल्या. मंत्री पातळीवरील बैठकाही निष्फळ ठरल्याने औषध संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व होलसेलरनी कंपन्यांकडे औषधाची ऑर्डरही दि. 1 जूनपासून बंद केली असल्याने अभुतपूर्व औषधांचा तुवटडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांचे हाल सुरु आहेत. अशातच राज्य संघटनेने अचानक मंगळवारपासून ग्रामीण भागातील औषधी दुकाने दुपारी एक ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू राहतील तर शहरी भागातही दुकाने दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरु राहतील, असे आंदोलन पुकारले. त्याप्रित्यर्थ नळदुर्ग-अणूदर-जळकोट परिसरातील औषधी दुकानदारांनी दुकाने दुपारी एक वाजता उघडली. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. हा संप किती दिवस अजून राहणार, याची माहितीही मिळू शकली नाही. औषधे ही जीवनावश्यक वस्तू असून शासनाने यामध्ये हस्तक्षेप करुन अन्न व औषध प्रशासनाचे आठमुडे धोरण त्वरीत थांबवावे व औषधी व्यावसायिकांना सुरळीत काम करु दयावे, अशी मागणी जनतेतून होत आहे. हा बंद यशस्वीतेसाठी उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय जाधव, गोविंद शिंदे, तुळजापूर तालुका कार्यकारिणी सदस्य सचिन कासार, जीवन मोकाशे यांनी पुढाकार घेतला.
 
Top