नळदुर्ग -: नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी वारंवार मागणी करुनही जमीन उपलब्ध न झाल्याने उपजिल्हा रुग्णालयासाठी प्राप्त झालेल्या निधी परत गेला होता. मात्र पालकमंत्री ना. मधुकररराव चव्हाण यांनी पुन्हा एकदा शासन दरबारी प्रयत्न करुन नळदुर्ग येथे मंजूर झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी तसेच वैदयकीय अधिकारी व इतर कर्मचा-यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी 21 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.
    पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या या प्रयत्नामुळे आता नळदुर्ग येथे लवकरच सुसज्य असे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालकमंत्री ना. चव्हाण हे सातत्याने नळदुर्ग शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून शहरात असणा-या प्राचीन अंबाबाई मंदिराचा सर्वांगिण विकास होणार आहे. अंबाबाई मंदिरासाठी ना. चव्हाण यांच्या प्रयत्नातून पर्यटन विकास योजनेंतर्गत तब्बल एक कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर ना. मधुकरराव चव्हाण यांच्या सांगण्यावरुनच नगरपरिषदेने अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी व त्या ठिकाणी येणा-या भाविकांच्या सोयीसाठी 65 लाख रुपये खर्चाचा सभागृह मंजूर केला आहे. त्यामुळे प्राचीन असणा-या अंबाबाई मंदिराचे भाग्य उजळले आहे.
    पालकमंत्री ना. चव्हाण यांनी नेहमीच नळदुर्ग शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम असो की, शहरातील रस्त्याचे काम असो प्रत्येक कामाला ना. चव्हाण कधीच निधीची कमतरता पडू दिली नाही. त्याचबरोबर शहरातील गरीब नागरिकांच्या कबाल्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्नही ना. चव्हाण यांनी केला. त्यांनी नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, गरीब नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन दरबारी प्रयत्न करुन नळदुर्ग येथे पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजूरी आणली होती. मात्र त्यानंतर नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी वारंवार मागणी करुनही जागा उपलब्ध करुन देण्यात आली नसल्याने उपजिल्हा रुग्णालय उभारणीसाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी परत गेला होता. त्यामुळे नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली होती. दरम्यान मध्यंतरीच्या काळात ना. चव्हाण यांनीच नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी लागणारी जवळपास पाच एकर जमीन शासनाकडून उपलब्ध करुन घेतली आहे. जमीन उपलब्ध झाली मात्र उपजिल्हा रुग्णालय उभारणीसाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी परत गेल्याने उपजिल्हा रुग्णालय उभारणीचे काम रेंगाळत पडले होते. मात्र पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करुन ना. मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकामासाठी व वैदयकीय अधिकारी तसेच इतर कर्मचा-यांचे निवासस्थान बांधण्यासाठी शासनाकडून तब्बल 21 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.    त्यामुळे आता लवकरच नळदुर्ग येथे सुसज्ज असे पन्नास खाटाचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
Top