कोल्हापूर -: कोल्हापुरातील 6666 शाळकरी मुली एकाच वेळी भव्य सामूहिक भरतनाट्यमचा आविष्कार घडवणार आहेत. जानेवारी महिन्यात आयोजित या उपक्रमाचा संकल्प दि. 6 ऑगस्ट रोजी नृत्यगुरू पंडित टी. रवींद्र यांच्या उपस्थितीत होणार आहे. या उपक्रमाच्या संयोजिका संयोगिता पाटील, सरला पाटील, शोभा पाटील व संजय भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
    संयोगिता पाटील यांनी याआधी 13 व 66 तास नृत्य केले होते. याचाच पुढचा टप्पा म्हणून सामूहिक भरतनाट्यम आयोजित करण्यात येणार आहे. 10 वर्षांखालील शाळकरी मुलींना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जाणार असून त्यांना भरतनाट्यमचा इतिहास, पद्धत, वेशभूषा, केशभूषा, घुंगरू बांधणे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
    या उपक्रमाची नोंद गिनीज  बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे. याआधी मुंबई येथे 4428 व तैवान येथे 3300 मुलींच्या सामूहिक नृत्याचा कार्यक्रम झाला आहे. या कार्यक्रमासाठी सहभागी होणा-या मुलींकडून काही शुल्क आकारले जाणार असून त्यांना वेशभूषा व मेकअपचे 4000 रुपयांचे किट पुरवण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

* सौजन्य दिव्यमराठी
 
Top