विधानसभा समालोचन
    विधानसभेच्या आजच्या कामकाजात विदर्भातील अतिवृष्टीच्या विषयावर झालेली चर्चा,प्रश्नोत्तरे इत्यादी कामकाज झाले. विदर्भातील अतिवृष्टीच्या विषयावर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले हेच आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्य होते.
    कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील गृहपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या अटक प्रकरणी सुजीत मिनचेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सदर आरोपीला निलंबित केल्याचे सांगितले. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-याची बदली करून एका महिन्यात चौकशी करण्याचे आदेश देण्याची घोषणा गृहमंत्री पाटील यांनी प्रा राम शिंदे याच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. निविदा प्रक्रियेत फेरफार केल्याबाबतच्या शिंदे यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. मुंबई, ठाणे,नवी मुंबई या ठिकाणी उड्डाणपुलाखाली असलेल्या वाहनतळांबाबतच्या नितीन सरदेसाई आणि इतर सदस्यांच्या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिलेल्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही त्यावेळी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी प्रश्न राखून ठेवला. राज्यातील आय.पी.एस. पोलीस अधिकारी सरकारी कोट्यातील घरे घेतल्याबाबत संजय गावंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री आर आर पाटील यांनी ज्या अधिका-यांनी नियमबाह्य वर्तंन केल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
    प्रश्नोत्तरांच्या कामकाजानंतर सदनात कागदपत्रे पटलावर ठेवण्याचे कामकाज पुकारण्यात आले त्यावेळी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आश्वासन समितीच्या गेल्या बावीस वर्षातील अहवाल सादर केल्याने त्यावर विरोधी बाजूच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी याबाबत गंभीर मुद्दे उपास्थित केले. अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मंत्री आणि सचिवांनी याबाबत लक्ष द्यावे अशी सूचना अध्यक्षानी केली.
    राज्यातील मराठवाडा, कोकण विशेषत: विदर्भातील अतिवृष्टीच्या विषयावर विजय वडेट्टीवार आणि इतर सदस्यांच्या प्रस्तावावर घणाघाती चर्चा झाली. चर्चेला सुरूवात करताना वडेट्टीवार यांनी ६६९ गावे बाधित झाल्याची माहिती दिली. पन्नास टक्केची अट न लावता हेक्टरी सरसकट २५ हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. मालगुजारी तलांवांच्या दुरूस्ती करिता दरवर्षी दोनशे कोटी रूपये देण्याची मागणी त्यानी केली. नाना पटोळे, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, आशिष जयस्वाल,अनिल बोंडे, गोपाळदास अगरवाल, विरेंद्र जगताप आदी सदस्यांनी या चर्चेत ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली. मदत आणि पुनर्वसन मंत्री डॉ पतंगराव कदम यांनी चर्चा सुरु असताना मध्येच अध्यक्षांच्या अनुमतीने सदनाबाहेर जाण्याची परवानगी मागितली त्यावेळी सदनात केवळएकच कँबिनेट मंत्री हजर असल्याने विरोधी तसेच सत्ताधारी सदस्यानी आक्षेप घेतल्याने कामकाज दहा मिनीटे तहकूब करावे लागले. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना सदनात अतिवृष्टीची चर्चा सुरू होती.
 
किशोर आपटे
 
Top