बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी येथील सतीश विश्वंभर भांगे या प्राणीमित्रांच्या घरात एक विलक्षण प्रकार घडला. घरातील वातावरणात संसार थाटलेल्या चिमणा-चिमणीला झालेल्या पिलांमुळे त्याच्या संसारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असतानाच अचानकपणे काळाने घाला घातला, अशी विलक्षण घटना घडली. ही जुलै महिन्यातील आठ तारखेची घटना आहे. सकाळी आठच्या दरम्यान नेहमीप्रमाणे चिमण्या मुक्त संचार करत होत्या. याचवेळी छतावर लटकवलेल्या इलेक्ट्रीक पंख्याला धडकून बिचारी चिमणी आपल्या प्राणाला मुकली. मरताना तिचे लक्ष आपल्या पिलांपाशी होते. चिमणा त्यावेळी डोळयादेखत सदरची घटना पाहून हळहळ करु लागला व तिच्या अत्यंत लहान चिमुकल्या तीन पिलांनी देखील हंबरडा फोडला. घरात एकदम कोलाहल माजला व मोठा चिविचाट तयार झला. काही वेळानंतर भांगे यांनी त्या चिमणीचा अंत्यविधी अंगणातील मोकळया पटांगणात केला. चिमणीच्या मृत्यूनंतर तिच्या संसाराची जबाबदारी त्या चिमणा असलेल्या जन्मदात्या बापावर येवून ठेपली. त्याने बाहेर जावून चारा गोळा करुन एक दाणा त्या लहान जीवांना देण्यास सुरुवात केली. तिनच दिवस झाले आणि 11 तारखेला पुन्हा एक अपघात झाला. जन्मदाता बाप असलेल्या चिमणा त्याच पंख्याला धडकून खाली कोसळला आणि त्यानंतर तीनही लहान जीव उघडयावर पडले. संपूर्ण छत्र हरवलेले अतयंत लहान जीव पोरके झाल्याची गोष्ट भांगे यांच्या परिवाराच्या लक्षात आली. त्यांनी त्यांच्यासाठी काही तरी करावे लागेल, असा विचार व्यक्त केला व काही वेळातच बाहेरुन एक चिमणा चिमणी घरातील चिमण्यांच्या घराजवळ घिरटया घालू लागले. भांगे यांना यावेळी त्या तीन जीवांचा प्रश्न निकाली निघाल्याचा आनंद झाला परंतु घडले ते विलक्षण होते. आलेल्या चिमणा-चिमणीने त्या तनीही जीवानं घ्ज्ञरातून बाहेर हुसकावल्यासारखे वरुन खाली ढकलून दिले आणि त्या घराचा ताबा घेतला. सदरची घटना पाहून भांगे यांची पत्नी सौ. नंदिनी, दोन मुले चि. आनंद आणि कु. अनामिका यांनी त्यांच्यावरील अन्याय झाल्याचे व त्यांना आपण जगवूया असा विचार मांडला. घरातील शिजविलेले भात, भगर इत्यादी खादय त्या जीवांना आपल्या हातांनी भरवण्यास सुरुवात केली. त्यांनाही परमेश्वराने आपल्यासारखी यांनाच पाठविले असल्यासारखा विश्वास मनात बाळगून त्याचे सेवन केले. दिवसेंदिवस त्यांच्यात सुधारणा होत गेली आणि त्यांना आपल्या आईवडिलांनंतरही संगोपन झाल्याचे समाधान वाटू लागले. त्यांना घरातील सर्व सदस्यांची सवय लागली. त्या तीनही चिमण्यांना घरातील एका खोक्यात पोत्यावर त्यांचे संगोपन सुरु झले. घास भरवताना त्यांना आपल्या हातावर घेवून खाऊ घालणे व त्यांच्याशी खेळणे याने तर त्यांच्या घरातील टीव्ही आणि रेडिओचाही विसर पडला. संगणकासमोर बसून फेसबूक आणि इंटरनेटऐवजी त्या लहान चिमण्यांशी खेळण्यात सर्वांनाच विलक्षण आनंद वाटत होता.
    आपण आजपर्यंत ऐकत आलो आहोत की, चिमण्यांना मानवांचा स्पर्श झाला की, त्यांना वाळीत टाकले जाते, त्यांच्यावर इतर चिमण्या हल्ला करुन त्यांना मारु टाकतात. परंतु भांगे परिवाराने ते सर्व खोटे असल्याचे सिध्द केले आहे. चिमण्या देखील आपल्यासारख्या जीव असून तुमच्या प्रेमाने त्यांना विश्वास निर्माण होतो आणि त्या विश्वासावरच एक वेगळे दृढ नाते निर्माण होते. आजकाल आईवडिलांचा सांभळ करणेदेखील अनेकांना नकोसे वाटत असताना घरातील चिमण्यांसारख्या जीवाची काळजी घेणारे देखील असल्याने त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे उदाहरण यातून दिसून येते.
 
Top