वारकरी संप्रदायातील कुंभमेळा म्हणून ज्या आषाढी यात्रेकडे पाहिले जाते त्या यात्रेतील प्रमुख दिवस एकादशीचा उत्सव समीप आला आहे. सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून, शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून रेल्वे, एसटी तसेच खासगी गाड्यांमधून दहा लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झालेत.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी पालख्यांचे आगमन झाले. र्शी संतर्शेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी आगमनावेळी विठूनामघोष गगन भेदून गेला. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे पंढरी फुलून गेली आहे. विठ्ठलभक्तीची अनामिक अनुभूती मन प्रसन्न करत आहे. अतिक्रमण हटलेल्या रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा नाही. माउली माउली म्हणत भाविक गर्दीतून वाट काढत आहेत.
श्री विठ्ठल दर्शनरांग मंदिरापासून अभियांत्रिकी महाविद्यालयाच्याही पुढे गेली आहे. पदस्पर्श दर्शनासाठी 22 तासांहून जास्त कालावधी लागतोय. मंदिर समितीने या वर्षी मुखदर्शनाचीही उत्तम व्यवस्था केली आहे. श्री विठ्ठल मूर्तीपासून अवघ्या 40 फुटावरून एका वेळी साधारण चार ते पाच लोकांना मुखदर्शन घडत आहे. याबरोबरच ऑनलाइन बुकिंग केलेल्या भाविकांनादेखील श्री विठुरायाचे दर्शन होत आहे.
पुण्यनगरी पंढरीमध्ये सगळीकडे टाळ मृदुंगाच्या निनादात हरिनामाचा गजर होत असल्यामुळे भक्तिरसात पंढरीनगरी न्हाऊन निघाली आहे. शहरातील विविध मठ, धर्मशाळा तसेच मंदिर परिसरातील मोठय़ा वाड्यांमधून भजन, कीर्तन व प्रवचनाचे स्वर कानी पडत आहेत. र्शी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागेचे वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रस्त्यावर वारकर्यांची प्रचंड गर्दी दिसत आहे.