उस्मानाबाद - निर्मल भारत अभियानांतर्गत निवडलेल्या गावात जनजागरण अभियान दि. 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2013 या कालावधीत जिल्हयात राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी चालू वर्षाकरीता निवडलेली गावे 100 टक्के हागणदारीमुक्त करुन निर्मल ग्राम करण्यात येणार आहे. गावा-गावात जनजागरण उपक्रम मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  एस. एल. हरिदास यांनी दिली.
          जनजागरण मोहिम अधिक गतीमान करणे व अभियानातून जिल्ह्याची स्वच्छता व्याप्ती वाढविण्यासाठी हिरीरीने प्रयत्न केले जाणर आहे. मोहिम जिल्हयात निवडलेल्या 106 गावातील ग्रामस्थांना स्वच्छ पाणी व स्वस्च्छतेसाठी शौचालय बांधकाम व वापर, स्वच्छ हात धुणे, पिण्याचे पाण्याची योग्य हाताळणी व लहान मुलांच्या विष्टेची योगय विल्हेवाटप लावण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्यावतीने दोन पथक तयार करण्यात आली आहेत.
            प्रत्येक दिवशी गावात सकाळी 10 वाजता शालेय विद्यार्थ्याची प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांना स्वच्छ हात धुणे, शालेय व अंगणवाडी शैचालय पाहणी करण्यात येणार आहे. शौचालय वापरण्यास योग्य असल्याची खात्री तज्ञांकडून करुन घेण्यात येईल. ज्या शाळा व अंगणवाडीतील शौचालय वापरण्यास अयोग्य असतील अशा शाळा व अंगणवाडीची नावे तज्ञ प्रशासकीय कार्यवाहीसाठी  जिल्हा परीषदेकडे पाठविण्यात येतील.
           गावात शौचालय नसणाऱ्या कुटुंबाची प्रत्यक्ष गृहभेट देवून त्यांना शौचालय बांधकामास प्रवृत्त करतील. त्याच दिवशी कमीत कमी गावातील 5 कुटुंबांच्या घरी शौचालय बांधकामाचे उदघाटन करण्यात येणार आहे.  त्याचे  नियोजन सरपंच व ग्रामसेवक करतील. गावात 1 एप्रिल 2012 नंतर ज्या कुटुंबांनी शौचालय बांधली, अशा कुटुंबाचा सत्कार करुन प्रोत्साहनपर निधीचे वाटप करण्यात येईल. प्रत्येक गावात सायंकाळी ग्रामसभा घेवून निर्मल भारत अभियान व शौचालय बांधकामाविषयी तज्ञ सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
         सदरील कार्यक्रमास सभापती / उपसभापती पंचायत समिती  व संबधित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तालुकास्तरीय सर्व खातेप्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top