मुंबई -: सोलापूर जिल्ह्यातील शिरबावीसह (ता. सांगोला) परिसरातील ८१ गावांच्या  प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांनाही व्यापक गती देऊन ही कामे पूर्ण करण्यात यावीत, असेही श्री. सोपल यांनी यावेळी सांगितले.    
    ना. सोपल यांच्या मंत्रालयीन दालनात काल याबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. मंत्री . सोपल यांनी यावेळी या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस आमदार गणपतराव देशमुख, आमदार लक्ष्मणराव ढोबळे, आमदार भारत भालके, आमदार दिपक साळुंखे-पाटील, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (एमजेपी) सदस्य सचिव श्री. मोपलवार, एमजेपीचे मुख्य अभियंता हेमंत लांडगे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी डि. सी. सुर्यवंशी यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
    सोपल म्हणाले की, शिरबावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची व्याप्ती मोठी असून सांगोला तालुक्यातील ८१ गावांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेतील एअर वॉलची गळती थांबविणे, पाणी टाक्यांची पुनर्उभारणी करणे यासह इतर कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. जेणेकरुन पाणी वाया न जाता गावकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल.
      पंढरपूर पाणीपुरवठा योजनेसाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्याबाबतही याप्रसंगी चर्चा झाली. पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्र आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यास प्राथम्याचे स्थान देण्यात यावे, असे निर्देश श्री. सोपल यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. मंगळवेढा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी, असेही सोपल यावेळी म्हणाले.        
 
Top