पिंपरी :- आळंदीत नव्या पुलावरून प्रवाशांना घेऊन जाणारी तवेरा गाडी पुलाचे लोखंडी कठडे तोडून इंद्रायणी नदीत वाहून गेल्याची घटना मंगळवारी घडली. या गाडीत सहा ते सात प्रवासी होते. गाडी कोसळल्याचे पाहताच येथे असलेल्या रिक्षा चालकांनी वाहून जात असलेल्या दोघा प्रवाशांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही.
     घटनेची माहिती मिळताच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दलाचे आणि तळेगाव येथील एनडीआरएफ जवान घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. दोरीच्या सहाय्याने रबरी बोट पाण्यामध्ये सोडून बोटीवरील जवानांनी गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही.
       एनडीआरएफच्या पाणबुडयांनी खोल बुडी घेऊन गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली असून रात्री उशिरापर्यंत गाडीचा ठावठिकाणा लागलेला नाही. प्रचंड पाऊस झाल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे प्रवाहात ही गाडी दूरवर वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या.
 
Top