औरंगाबाद : राज्यातील रस्ते विकासाच्या कामांना चालना देण्यात येत असून त्यासाठी निधीची भरीव तरतूदही करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैठण तालुक्यातील बिडकीन येथे सांगितले.

बिडकीन येथील ग्रामीण रूग्णालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच डॉक्टरांसाठीच्या निवासी इमारतीचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री प्रा.फौजिया खान, पैठणचे आमदार संजय वाघचौरे, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, हरिश्चंद्र लघाने तसेच आरोग्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याआधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत बिडकीन ते पानरांजणगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले.

श्री.पवार म्हणाले, टंचाई स्थितीचा मुकाबला शासनाने अत्यंत चांगल्या पद्धतीने केला. चारा छावण्यांद्वारे जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय करण्यात आली. नरेगाअंतर्गत विविध कामे उपलब्ध करून देण्यात आली. खरीप हंगामासाठी बियाणे व खतांची उपलब्धता आहे. आगामी काळात ठिबक सिंचन पद्धतीचाच अधिक वापर करणे गरजेचे असून पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविण्यावर भर द्यावा. यासाठी तसेच वृक्षलागवडीसाठी अधिक लोकसहभाग वाढवावा. सिमेंट बंधाऱ्यांसाठी निधी देण्यात आला असून यापुढील काळातही या कामासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. गोरगरिबांना स्वस्तात धान्य वाटपाची योजना सुरू करण्यात येत असून यासंदर्भात सर्वेक्षण सुरू आहे. आरोग्य सुविधांबाबत श्री.पवार म्हणाले, गरीब जनतेला दिलासा देणारी राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात लवकरच सर्वत्र सुरू करण्यात येणार आहे. ब्लड ऑन कॉल तसेच त्वरित ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यासंदर्भातील योजनाही आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

वस्त्रोद्योग, क्रीडा तसेच उद्योग धोरण जाहीर करण्यात आले असून राज्यात अनेक ठिकाणी टेक्सटाईल पार्क्सना मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत विविध सवलती देण्यात येतात. तसेच याद्वारे अनेकांना रोजगारही उपलब्ध होतो. औरंगाबादमधील तरुणांनीही टेक्सटाईल पार्कसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री.पवार यांनी केले. पैठण येथील संतपीठाच्या उभारणीला चालना देणार असून ते लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत रस्ते, चौक, प्रवेशद्वारे, पादचारी मार्ग, घनकचरा व्यवस्थापन तसेच पैठण शहरात अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम अशी विविध कामे हाती घेण्यात येत आहेत. आगामी सणासुदीच्या दिवसात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासंदर्भात सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. डीएमआयसी (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोबदल्यासाठीचे दर वाढवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही श्री.पवार यांनी सांगितले.

श्री.टोपे म्हणाले, बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहे. डीएमआयसी (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) अंतर्गत परिसराचा विविध अंगांनी विकास होणार असून याचा लाभ तालुक्यातील जनतेला मिळणार असल्याचेही श्री.टोपे यांनी सांगितले.

फौजिया खान म्हणाल्या, आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत असून लोकांना चांगली आरोग्य सेवा गावातच मिळावी यावर भर देण्यात येत आहे. पैठण तालुक्यात लवकरच आठ नवीन उपकेंद्रे सुरू होणार आहेत. बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व पदे भरलेली असून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य सेवा मिळणार आहे. गरीबांना दिलासा देणारी राजीव गांधी जीवनदायी योजना लवकरच राज्यात सर्वत्र सुरू करण्यात येत आहे. अपघातग्रस्त व्यक्तींचा जीव वाचविण्यासाठी अपघात झाल्यास त्वरित ॲम्ब्युलन्स उपलब्ध होणार असल्याचेही श्रीमती खान यांनी सांगितले.

डीएमआयसी अंतर्गत बिडकीन परिसरात विविध कामे होणार आहेत, पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गतही विविध विकासकामे हाती घेण्यात येत असल्याचे श्री.वाघचौरे यांनी सांगितले.
 
Top