![]() |
इंद्रजित देवकते |
उस्मानाबाद -: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नूतन कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्षपदी इंद्रजित देवकते व प्रशांत नवगिरे यांची निवड करण्यात आली असून, माजी तिन्ही जिल्हाप्रमुखांची जिल्हा सचिवपदावर नियुक्ती करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उपजिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्षांच्याही निवडी करण्यात आल्या आहेत.
![]() |
प्रशांत नवगिरे |
गेल्या दोन दिवसांपासू पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार बाळा नांदगावकर यांनी जिल्ह्यात बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. इंद्रजित देवकते यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करून उस्मानाबाद - कळंब व भूम - परंडा - वाशी या दोन विधानसभा मतदार संघांची तर महाराष्ट्र राज्य परिवहन नवनिर्माण सेनेचे प्रशांत नवगिरे यांचीही जिल्हाध्यक्षपदी निवड करून उमरगा - लोहारा, तुळजापूर मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवकते पूर्वी पक्षाच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष होते. त्यांनी अनेक आंदोलने करून जिल्ह्यात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यामुळे त्यांना पद देण्यात आले. तसेच पूर्वी जिल्हा संघटक म्हणून काम केलेले नवगिरे यांनी पूर्वीपासूनच परिवहन सेनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवल्यामुळे त्यांना पद मिळाले आहे. दोघांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत असला तरी त्यांची वाटचाल गटबाजीविरहित झाली तरच त्यांना यश मिळणार आहे. उपाध्यक्षपदी जुने सरचिटणीस दिनेश देशमुख व उमरग्याचे अविनाश साळुंके यांना बसवण्यात आले आहे. त्यांचेही कार्यक्षेत्र जिल्हा अध्यक्षांप्रमाणेच असणार आहे. पूर्ण जिल्ह्यासाठी वैशाली गायकवाड यांची महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.