महाराष्ट्राच्या संतभूमीत भारतीय संस्कृती वारसा जपणारा मठ म्हणून कोल्हापूर येथील कणेरी मठ श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ, कणेरी प्रसिध्द आहे. या मठात भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. त्यामुळे भाविकांचे समाधान होऊन मन:शांती प्राप्त होते. भारत देशास एक इतिहास असून संस्कृती टिकून ठेवण्याचे कामही अन्य मठाबरोबरच या मठात होते. हे एक प्राचीन तीर्थस्थान आहे.
कोल्हापूर जिल्हा म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पुण्यमय प्रदेश आहे. या जिल्ह्याला धार्मीक, ऐतिहासिक आणि सामाजिक प्रतिष्ठेची पार्श्वभूमी आहे. या जिल्ह्याला पर्वत प्रदेश, वनसंपदा, वनस्पतीसंपदा, जलसंपदा उदंड लाभलेली आहे. या ठिकाणी घनदाट वनराई आहे.पुरोगामीत्वाची वेगळी अशी ओळख आहे. काडसिध्देश्वर हे सांप्रदायाचे मुळ स्थान कोल्हापूरच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गाला लागून असणारे सिध्दगिरी क्षेत्र अत्यंत पुरातन, धार्मीक व अध्यात्मिक पीठ आहे. याची ओळख जगद्गुरु काडसिध्देश्वरांचा मठ अशी आहे. जवळच कणेरी गाव आहे. म्हणूनच त्याला कणेरी मठ असेही म्हणतात. कणेरी हे गाव सिध्दगिरी मठाच्या कुशीत वनराईने वसलेले आहे. गावाला 11 व्या शतकापासून 900 वर्षांचा इतिहास आहे. हे अनेक गावांचे श्रध्दास्थान असून येथे साधु, महंतांसह अनेक नामवंत दर्शनासाठी येतात. या मठाच्या अधिपत्याखाली सुमारे छोटे-मोठे 200 मठ असून ते महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश व कर्नाटक आदि भागात विखुरलेले आहेत.
जगतगुरु काडसिध्देश्वर हे हेमांडपंथी शिल्पकेलेचे भव्य शिवमंदीर आहे. या मठात महाशिवरात्री, श्रावण सप्ताह,प्रतिमास पौर्णिमा,गुरूपौर्णिमा तसेच गुरु आराधना आणि श्री काडसिध्देश्वर यांचा पालखीचा सोहळा आदि उत्सव साजरे केले जातात. यामध्ये लाखो भाविक श्रध्देने सहभागी होतात. त्यावेळी त्यांना सत्संग, प्रवचन, प्रबोधन केले जाते.
या काडसिध्देश्वरांची पहाटे पाच वाजता, सकाळी अकरा वा., दुपारी दोन वा. आणि संध्याकाळी सात वा. अशी दिवसातून चतुष्काल पूजा होते. मंदिरात नित्य रुद्राभिषेक चालतो. भाविकांसाठी या मठात सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत बाराही महिने अन्नछत्र चालू असते. मठाभोवतीने दगडी तटबंदी आहे. मठाच्या मध्यभागी सिध्देश्वरांचे देवालय आहे. त्याच्या भोवती समाधी, अडकेश्वर, चक्रेरश्वर, रुद्रपाद देवालयेही आहेत. येथील प्रमुख निलगार हे लिंगायत आहेत. त्यांना आपल्या सणांच्या वेळी, धार्मीक विधी, ध्यानाच्या वेळी आणि सामाजिक कार्यात या मठाचे महत्व प्राप्त झाले आहे.
ब्रम्ह्मलीन जगद्गुरु श्री मुप्पिन काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी मठ पूर्वीप्रमाणे सर्व जातीधर्मांसाठी खुला केला आहे. हे स्वामी महाराज म्हणजे चालते-बोलते वेदांत! त्यांनी वर्णभेद, वर्गभेद, लिंगभेदसाठी समाजाचा रोष ओढवून घेतला खरा पण ते विचलित झाले नाहीत. आपल्या मठाच्या परंपरेनुसार उत्तराधिकाऱ्यांची निवड योग्यतेच्या आधारावर केली आणि खरे संन्याशी म्हणून राहिले. पुरोगामीत्वाची खऱ्या अर्थाने जाणीव त्यांनी समस्त समाजाला करुन दिली. त्यांच्या या कार्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. हा संस्थान मठ असून सध्या 200 ते 300 एकर जमीन मठाकडे आहे. संस्थांनाप्रमाणे सर्व प्रकारचे वैभव या मठाला आहे. त्याच्या पाठीमागे पश्चिमेला उजव्या बाजूस मुप्पीन काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांचे समाधीस्थान व गुरुदेव ध्यान मंदीर आहे. येथे साधकांना ध्यानधारणा करण्यारिता पोषक व पुरक वातावरण असल्याची अनुभूती त्यात प्रवेश केल्याबरोबरच येते. मुख्य मंदिरांच्या बाजूस श्री सिध्दरामेश्वर महाराजांची प्रतिकात्मक समाधी असलेला मंडप आहे. मंदीराच्या बाहेरील बाजूस जलमंदीर असून ते आलेल्या भाविकांची तृष्णा तृप्त करीत आहे. पाणपोईच्या मागील बाजूस पंचकर्म चिकित्सालय आहे. येथे जुन्या असाध्य अशा आजारांवर इलाज करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म पध्दतीने उपचार केले जातात. याच शेजारी दोन क्राँक्रीटचे महाकाय हत्ती यात्रेकरुचे लक्ष वेधून घेत आहेत.
पायऱ्या उतरल्यानंतर महाकाय नंदी व पिंडीच्या आकाराच्या छोटया मंदीरावर 25 फूट उंचीची शंकराची मुर्ती सगळयांना आकर्षून घेते. पश्चिमेस भक्तमंडळींची राहण्याची सोय व्हावी म्हणून भक्तनिवास आहे. तेथेच प्रसादनिलय व अतिथीगृह आहेत. भक्तांसाठी दोन भव्य प्रवचन मंडप आहेत. या मठामार्फत 27 वे मठाधिपती श्री अदृश्य काडसिध्देश्वर स्वामींजीच्या प्रेरणेने 1997 साली सिध्दगिरी गुरुकुल फाऊंडेशनची स्थापना झाली. त्यांच्या अधिपत्याखाली आजपर्यंत 50 च्या वर ग्रंथ व विविध पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. या पीठाची अध्यात्मिक धुरा अतिशय जबाबदारीने ते पार पाडत आहेत. ते सर्व विषयांत पारंगत असून अतिशय विद्वान आहेत. त्यांचे देशात इतर ठिकाणीही वारंवार प्रवचन व व्याख्यान होत असतात. विज्ञान व अध्यात्म यांची उत्तम सांगड घालून ते मठाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या शिष्यापैकी योगगुरु मारुती लांबोरे सर, दत्ता पाटील, सौ.दाभोळकर मॅडम, गणेश ठाकूर सर, वसंत मोरे (मामा), दत्ता आखाडे, रणजित सडोले, आचारी निंबाळकर (काका) यांचे मठाला प्रगतीपथावर नेण्यासाठी नेहमी प्रयत्न सुरु असतात.
युवक व युवतींच्या व्यक्तीमत्व विकासाकरिता वर्षातून दिवाळी व उन्हाळयाच्या सुटीमध्ये दहा दिवशीय बाल-चेतना व युवा-चेतना शिबीराचे आयोजन या मठामार्फत केले जाते. शिबीरात सहभागी होणाऱ्या सर्वांची राहणे व जेवणाची सोय मोफत केली जाते. या शिबीरात प्रामुख्याने योगअभ्यास, प्रवचन, संस्कृत अभ्यास आणि भजन आदि विषयावंर म्हैसूर, विजापूर अक्संबा, पतंजली आदि ठिकाणाहून येणाऱ्या योगगुरु व प्रवचनकार यांच्यामार्फत शिक्षण दिले जाते. तसेच या मठात सतत या ठिकाणी देशभरातून शिक्षण घेण्यासाठी शिष्यगण/ योगी,महात्मे या ठिकाणी येतात त्यांचीही शिक्षण, राहणे व भोजनाची सोय मोफत केली जाते.
गोशाळा
श्रीक्षेत्र सिध्देगिरी मठाच्या अधिनस्त गोशाळा असून यामध्ये भारतीय वंशातील देशी गायी येथे आहेत. त्यात प्रामुख्याने लाल कंधारी, देवणी, आणि खिल्लारी या गाईंचा समावेश आहे. गाईपासून मिळणारे दुध, दही, तूप, शेण आणि गोमूत्रापासून विविध पदार्थ या मठात तयार केले जातात. दरवर्षी गो परिक्रमा आयोजित केली जाते. गायीचे संवर्धन होण्यासाठी पशुपालक गायो विश्वस्य मातरम् अशा घोषवाक्य असलेल्या टोप्या घालतात. गाईच्या गोमुत्र व शेणापासून उत्तम प्रकारचे गांडूळखत निर्मिती केली जाते. गोमूत्रापासून विविध प्रकारची आरोग्य विषयक औषधी तयार केल्या जातात. बिघडलेलं मानवी आरोग्य, नापीक होऊ लागलेली शेती यावर शेतकरी व पत्रकारांची कार्यशाळा या ठिकाणी घेतल्या जातात, त्यावर संशोधन केले जाते व गाय संवर्धन करण्याचे महत्व सांगून त्या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा मठाधिपती अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी सतत प्रयत्न करत आहेत. या गोशाळेत सुमारे 400 गायी असून त्यांचे दुध, तुप व ताक भक्तांना ते अन्नछत्रामार्फत दिले जाते.
देशीगाईचे शेण व पालापाचोळा इत्यादीपासून गांडूळ खत निर्मिती केली जाते. त्यामुळे जमिनीचे पोत सुधारुन उत्पादक क्षमता वाढविता येते व त्यामुळे शेतकरी स्वावलंबी होण्यास मदत होते. येथे आझोला चारा प्रकल्प असून आठ इंच खोल पाण्याचे वाफे बनवून त्यामध्ये माती व गोमयाच्या मदतीने आझोला नावाचा हिरवा चारा उत्पादित केला जातो. 6 मीटर क्षेत्रफळाच्या टाकीतून दर दिवशी 2 ते 3 किलो हिरवा चारा मिळतो. या चाऱ्यामध्ये प्रथिने, क्षार व सुक्ष्म अन्नद्रव्य पुरेशे प्रमाणात असल्याने जनावरे दुध भरपूर देतात. गोशाळेच्या जवळ गुऱ्हाळ असून तेथे सेंद्रीय पध्दतीने मठाच्या शेतीत पिकविलेल्या ऊसापासून सेंद्रीय गुळ तयार केला जातो. या मठामार्फत सेंद्रीय गुळ व देशी गायीचे शुध्द तूप विक्रीसाठी त्यांच्या स्टॉलवर ठेवण्यात आला आहे.
मठाची पाण्याची तहान भागविण्यासाठी स्वत:च्या खर्चातून 5 कोटी रुपयांची योजना राबवून एक आदर्श निर्माण केला असून कोणत्याही ऋतूमध्ये पाण्याची कमतरता या ठिकाणी भासत नाही.
दिनदर्शिका
सिध्दगिरी म्युझियम्, ग्राम जीवन, प्राचीन प्रतिभावंत या नावाने दरवर्षी दिनदिर्शिका प्रकाशित केली जाते. यामध्ये वर्षभर होणार श्री क्षेत्र सिध्दगिरी मठाच्या कार्यक्रमाची माहिती या दिनदर्शिकामधून भक्तांना दर्शविण्यात येत असते.
सिध्दगिरी हॉस्पिटल
या मठाच्या अधिनस्त सिध्दगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कणेरी, ता. करवीर, जि.कोल्हापूर च्यावतीने या भागातील सर्व भक्तांना व येणाऱ्या सर्व आजारी पिडीतांना 150 खाटांचे अद्ययावत सेवा देणारे हॉस्पिटलही बांधण्यात आले आहे. या इस्पितळात गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविली जाते. होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय मठाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे.
म्युझियम
सिध्दगिरी म्युझियम प्राचीन प्रतिष्ठानचे उदघाटन दि.6डिसेंबर,2008 रोजी प.पू.श्री. काडसिध्देश्वर स्वामींनी व मा.त्यागवीर नानासाहेब पाठारे व शिवसंग्रामचे संस्थापक तथा आमदार विनायक मेटे, तसेच दैनिक पुढारीचे मुख्यसंपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या परम सानिध्यात श्रीक्षेत्र सिध्देगिरी मठ, कणेरी ता.करवीर जि.कोल्हापूर येथे झाले.
हे म्युझियम 8 ते 10 एकरवर वसलेले खेडं होय. एक स्वावलंबी, जिवंत खेडं ! ग्रामीण संस्कृतीवर आधारित असा हा आगळावेगळा प्रकल्प हा महाराष्ट्रातील नव्हे देशातील पहिलाच उपक्रम असावा, असे वाटते. सिध्दगिरी मठाच्या प्रवेशद्वारात प्रवेश केल्यानंतर प्राचीन कालीन कपिलमुनी, पतंजली, वेदव्यास, महर्षी कणाद, नारद, चिरकारिक , भगीरथ, विष्णू शर्मा, गर्गी, अक्षपात गौतम, जैमिनी, चरक, सुश्रुत, जीवक, आर्यभट्ट, नागार्जून, वाल्मिकी महर्षी, हर्षवर्धन, विद्यावाचस्पती, भरत ( शंकुतलेचा), भरतमुनी, पाणिनी, एकलव्य, शबरी, वराहमिहीर, सुरपाल, यशोदा, चाणक्य, महर्षी पराशर आणि काश्यप यांच्यासह 32 शास्त्रज्ञांचे सिमेंट क्राँकीट मध्ये तयार केलेले गुंफांमधील चित्रांची हुबेहुब झलक प्रत्येकाला आकर्षित करते. त्यांच्या कालखंडात केलेल्या कार्याचा आढावा लेखी स्वरुपात नमूद केला आहे. प्रत्येक मूर्तीच्या बाजूला भिंतीवर सर्व प्रकारची योगासने वेगवेगळया भागात शिल्प स्वरुपात आहेत.विशेष म्हणजे त्यांनी ग्रामीण संस्कृतीचे सर्व बारकावे यामध्ये टिपले आहेत.
मठाच्या परिसरातील गावात आजही पारंपारिक बलुतेदार आलुतेदार आपला पारंपारिक व्यवसाय करतांना दिसतात. यामुळे त्यांच्या जीवनपध्दती, घरांची मांडणी व त्यांची वेशभूषा सर्वांना आनंददायी आहे. हनुमान मंदीर, विठ्ठल मंदीर, जैन मंदीर तसेच ग्राम देवतेचे मंदीर या खेडयाची अध्यामिक पंरपरा सांभाळतांना दिसून येत आहे.
गावच्या पाणवठयावर रहाटाने विहिरीतून पाणी काढणाऱ्या बायका, विटी दांडू,खेळणारी मुले, गाई-म्हैशी राखणारा गुराखी, मेंढपाठ, काठी अन् घोंगड घेऊन शेळया राखणारा धनगर, व्हाटयांचा खेळ, विश्रांती घेणारे यात्रीक, यात्रे करु साठी बैलगाडया, गाडगे, पेरणी कुळवट, मळणी, धान्यवारे देणे, कोळपणी, नांगरणी, लगोरीचा खेळ अशी शेतीविषयक अवजारे यांचे चित्रमय दर्शन घडवते. औताला जुंपलेली बैलगाडी, जुन्या पारंपारिक पध्दतीने शेती करणारा शेतकरी आणि स्वता:ला वाहून घेतलेलं त्याचं कुटूंब, मोटेचं पाणी, हंडयावर हंडे ठेवून पाणी भरणाऱ्या गृहिणी, कावड घेऊन पाणी भरणारा गावकरी हे ही या ठिकाणी पाहवयास मिळते. गावा-मध्ये पार कटयावर बसून न्यायनिवाडा करणारी पंचायत समिती, शाळेत जाणारी मुले आणि संपूर्ण गावात उठून दिसणारा पाटलाचा वाडा यासारखी दृश्ये या खेडयात पाहायला मिळतात.
परतीच्या प्रवासात लमानांचे घर, हनुमान मंदीरातील प्रवचन, वासूदेव, सोमवार कट्टा, अस्वलांचा खेळ, चुनाभट्टी, विठ्ठल मंदीर, शिंग फुकणारा, पावश्या, गाव चावडी, गारुडी, माळी, कोंडवाडा, सुतार, लोहार, गोटयांचा खेळ, तांबट, पिंजाऱ्याचे घर, धनगरांचे घर, अंधळी कोशीबीर, लक्ष्मी मंदीर, शिंपी, कासार, मुंबई दर्शन, बाजार कट्टा, मुलींच्या जिबलीचा खेळ, मंदीरातील शाळा, धार लावणारा नाभीक, धोबी, परीट, शेवया करणाऱ्या स्त्रिया, नारळ सोलणी, जाते दळणे, नालबंद न्याय पंचायत कट्टा, तालीम, गोंधळी, चर्मकार (चांभार), बुरुड, गुरव, कोरवी, कातडी कमाविणारा,मांतग (दोरखंड बनविणे), पाथरवाट, कोळयांचे घर, कुंभाराचे घर, लाकुड फोडणारा, वतनदारांचा वाडा, ( गवंडी), डोंबाऱ्यांचा खेळ अशी वास्तूशिल्प आहेत. तसेच उत्सव विभाग (स्वतंत्र) आहे. यामध्ये सर्व सण उत्सव साजरे केले जातात त्याचे हुबेहुब दर्शन यामध्ये होते. त्यानंतर पुढील वाटेत कोष्टयाचे घर , पिंगळा जोशी, तेल्याचे घर, वाणी दुकान, पाठवणी, वृध्दाची सेवा, सोनारांचे घर,अत्ताराचे घर, वैद्यांचे घर, जोशीचे घर, याची चालत असलेली कामे बहुरंगी चित्रमय स्वरुपात हुबेहुब रेखाटली आहेत.
राशी उद्यान
या सिध्दगिरी म्युझियमधून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला राशी उद्यान असून येथे 12 राशी साकारल्या आहेत. प्रत्येक जण आपली रास पाहून आनंद व्यक्त करतांना दिसत असतो.
मठाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तक घेऊन त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी गावातील महिला शिक्षिका नेमून दररोज विशेष वर्गाचे आयोजन करून त्यांच्यावर योग्य ते संस्कार करण्याचे काम करुन त्या शिक्षिकेला मठाच्या वतीने मानधनही दिले जाते.
प्रत्येकाने पहावा असाच हा मठ आहे ! उत्सुकतेने येणारा प्रत्येक जण येथे पाहू किती हो नयनाशी या अवस्थेत जातो. हे वैभव जपले जावे, वाढले जावे, यासाठी प्रत्येकाचाच खरेतर सहभाग हवा !
* अशोक रामलिंग माळगे,
उस्मानाबाद
उस्मानाबाद