सोलापूर : बार्शी उपसा सिंचन योजनेतंर्गत माढा तालुक्यातील रिधोरे गावाजवळ उभारण्यात येणाऱ्या पंपगृहाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाची पाहणी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी करुन या योजनेतील दोन्ही टप्प्यांचे पूर्ण काम 31 डिसेंबर 2013 अखेर पर्यंत पूर्ण करावे असे निर्देश संबंधितांना दिले. 
     पालकमंत्री सोपल पुढे म्हणाले की,  या बांधकामाची गुणवत्ताही जोपासली जावी. त्याचबरोबर येत्या 20 सप्टेंबर रोजी पंप फ्लोअरचे तर दुस-या स्लॅबच्या टप्प्याचे काम 10 ऑक्टोंबर पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी संबंधिताना यावेळी दिल्या.
       प्रारंभी भीमा कालवा मंडळ (सोलापूर) चे अधिक्षक अभियंता त.बा.तोंडे यांनी या योजनेबाबत आत्तापर्यंत झालेल्या कामाची माहिती ना. सोपल यांना दिली. भीमा-सीना जोड कालव्याद्वारे सीना नदीत सोडले जाणारे 2.59 टी.एम.सी. पाणी दोन टप्प्यात उपसा करुन आठमाही पद्धतीने ते बार्शी तालुक्यातील 12 हजार 550 हेक्टर व माढा तालुक्यातील 2 हजार 450 हेक्टर अशा एकूण पंधरा हजार हेक्टर इतक्या क्षेत्राला सिंचनासाठी  देण्यात येणार आहे.
       याप्रसंगी  नगरसेवक नागेश अक्कलकोटे, उजनी कालवा विभाग क्रं.8 चे कार्यकारी अभियंता बी.एस. बिराजदार, उप-कार्यकारी अभियंता एस.एस. तिपरादी,  शाखा अभियंता एस.के होनखांबे, व्ही.एस. जाधव, दुध संघाचे मा.अध्यक्ष कुंडलिक गायकवाड आदी उपस्थित होते.
 
Top