उस्मानाबाद -: दरोड्या तयारीत असणार्‍या सातारा जिल्ह्यातील पाच जणांना उस्मानाबाद दरोडा प्रतिबंधक पथकाने गुरुवार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी मोठय़ा शिताफीने गजाआड केले. यावेळी त्यांच्याकडून चोरीची टाटासुमो, धारदार शस्त्र, मिरची पूड असे साहित्य जप्त केले.
    दरोडा प्रतिबंधक पथकाचे उपनिरीक्षक महादेव गोमारे कर्मचार्‍यांसह गुरुवारी दुपारी गुन्हेगारांच्या शोधात येरमाळा, तेरखेडा परिसरात फिरत होते. यावेळी त्यांना तेरखेडा शिवारात पांढर्‍या रंगाच्या टाटासुमो जीपमधून काहीजण संशयास्पद फिरत असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पथकाने तेरखेडा शिवारातून अचानक टाटासुमो जीपचा ताबा घेऊन आतमधील संतोष नागप्पा भिसनाळ (26,तळेगाव दाभाडे), संतोष चंद्रकांत वाडेकर (36, पुसेगाव, सातारा), संतोष चांगदेव राईज (20, तळेगाव दाभाडे), सूरज हनुमंत जाधव (19, पुसेगाव) व कुमार बद्रु पवार (19, पुसेगाव, सातारा) यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे गाडीच्या कागदपत्राविषयी चौकशी केल्यानंतर जीप क्र. एमएच 14- बीके- 7060 तळेगाव दाभाडे येथून चोरल्याचे समोर आले. त्यानंतर गाडीची तपासणी केली असता आतमध्ये जर्कीनच्या खाली दोन तलवारी, जंबीया, लाकडाच्या काट्या, गाड्यांच्या चाव्यांचा झुपका, सुती दोरी, माकड टोप्या, मिरची पावडर, दोन बॅटर्‍या व रोख 11,560 रुपये आढळून आले. सदरील गुन्हेगार दरोड्याच्या तयारीत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानुसार या सर्वांना येरमाळा पोलिस ठाण्यात आणून उपनिरीक्षक महादेव गोमारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक माधव गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे उपनिरीक्षक महादेव गोमारे, कर्मचारी मधुकर घायाळ, मोईन काझी, तानाजी माळी, प्रफुल्ल ढगे, अनंत ताटे, विक्रम सावंत, इरफान शेख, चालक दत्ता करडे, काका शेंडगे यांनी केली.
 
Top