मुंबई : राज्य शासनाचा सन 2013 साठीचा भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना जाहीर करण्यात आला आहे. रुपये पाच लाख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखालील निर्णय समितीने नुकताच हा पुरस्कार घोषित केला आहे.
    दिनांक 25 ऑगस्ट 1945 रोजी जन्मलेल्या अशोक पत्की यांना बालपणापासूनच संगीताची गोडी होती. तबला, पेटी अशी वाद्ये लिलया हाताळत ते त्यांची बहिण मीना हीच्या साथीने लहान –मोठे कार्यक्रम करु लागले. त्यातूनच त्यांचा परिचय त्यावेळच्या अतिशय लोकप्रिय गायिका सुमन कल्याणपूर यांच्याशी झाला. सुमनताईंना देश-विदेशातील कार्यक्रमांमध्ये  वाद्यांची साथ-संगत करतानाच अशोक पत्की यांच्यातील संगीतकार फुलत गेला. सन 1972 मध्ये त्यांनी संगीतबध्द केलेली व सुमन कल्याणपूर यांनी गायिलेली भावगीतांची रेकॉर्ड एचएमव्ही कंपनीने काढली व त्याला अमाप लोकप्रियता लाभली. त्यानंतर त्यांची कारकीर्द बहरू लागली. ‘नाविका रे’, ‘केतकीच्या बनी तिथे’ या सारख्या त्यांच्या सुमधुर सुरावटी रसिकांच्या मनात रुंजी घालू लागल्या. एक प्रथितयश संगीतकार, उत्कृष्ट संगीत संयोजक म्हणून नावारुपाला येत त्यांनी अनेक मराठी चित्रपट गीतांना तसेच भावगीतांना सुमधुर संगीत दिले. अर्धांगी, आपली माणसं व सावली या चित्रपटांसाठी त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार प्राप्त झाला असून अंतर्नाद या कोकणी चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला .
     चित्रपट आणि भावसंगीताबरोबरच मराठी नाटकातील गीतांना संगीत आणि पार्श्वसंगीत देण्यातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. मोरुची मावशी, प्रियतमा, एका लग्नाची गोष्ट या सारख्या अनेक नाटकांना संगीत रसिकांना अतिशय भावले व राज्य शासनाच्या नाटय संगीताच्या पुरस्कारांची मोहरही त्यावर उमटली.
    जाहिरातींचे संगीत अर्थात जिंगल्‍स या एका सर्वस्वी वेगळ्या आणि प्रतिभेची कसोटी बघणाऱ्या क्षेत्रातही त्यांनी स्वत:चे सर्वोच्च स्थान निर्माण केले. सुमारे पाच हजाराच्या वर जिंगल्सना त्यांनी दिलेले संगीत लहान-थोरांच्या ओठांवर सहज रुजले. या त्यांच्या आगळ्या-वेगळ्या कर्तृत्वाची पावती त्यांना  ‘रापा’ सारख्या अतिशय प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी मिळाली. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’हे त्यांनी संगीतबध्द केलेले गीत जणू राष्ट्रीय गानच ठरले आहे. अशोक पत्की यांनी ‘राधा ही बावरी’, ‘सप्तसूर माझे’ इ. लिहिलेली गीते आजच्या तरुणाईला भावली आहेत.  ‘सप्तसूर माझे’ हे त्यांचे आत्मचरित्र अलिकडेच प्रसिध्द झाले असून अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे.
    अशोक पत्की यांच्या संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ आणि अमूल्य अशा कामगिरीचा शासनाला अभिमान असून शासनाच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री सजंय देवतळे यांनी श्री. पत्की यांचे अभिनंदन केले आहे.
 
Top