बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शहराच्या सौंदर्यासोबत सामाजिक शांतता बिघडविण्याचे प्रमुख कारण असलेल्या डिजीटल संदर्भात वरिष्ठ पातळीवरील आदेशानंतर मंगळवारी बार्शी पोलीस ठाण्यात पत्रकार, नगरपालिका, पोलिस प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
    यावेळी अध्यक्षस्थानी विभागीय पोलीस अधिकारी रोहिदास पवार, पोलीस निरीक्षक सालार चाऊस, उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, पंचायत समितीचे उपसभापती केशव घोगरे, माजी सभापती सुभाष लोढा, नगरसेवक विजय राऊत उपस्थित होते.
    या चर्चेत बेकायदा फलक व फलक लावणा-यांविरुध्द कायदेशीर उपाययोजना करण्याबात साधक बाधक चर्चा झाली. प्रामुख्याने डिजीटल फलकाचा आकार, उंची, त्यावरील मजकूर, छायाचित्रे याबरोबरच डिजीटल फलक लावण्याचा रितसर नगरपरिषदेचा परवाना क्रमांक व डिजीटल लावण्याची व लावण्यापूर्वी घ्यावयाची परवानगी या मुदयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. डिजीटल फलक लावणा-याचे नाव, संपर्क क्रमांक, परवाना क्रमांक व मुदत डिजीटल फलकावर प्रसिध्द करण्याचे निश्चित झाले. असे न करणा-या विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे धोरण निश्चित झाले. डिजीटल फलकावरील मजकूराची छाननी पोलीस प्रशासनाने केल्यानंतरच सदरचा मजकूर डिजीटलवर प्रसिध्द करण्याचेही यावेळी ठरले.
    याप्रसंगी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी, नगरसेवक अशोक बोकेफोडे, अनिल पवार, रमेश पाटील, महेदीमिया लांडगे, सचिन गायकवाड, संदीप आलाट, विक्रम सावळे, बाबा कापसे, तानाजी बोकेफोडे यांनी चर्चेत सहभाग घेत सुचना मांडल्या. शेवटी आभार सालार चाऊस यांनी मानले.
 
Top