नळदुर्ग -: वीज महावितरण कंपनीने थकीत वीज बिलापोटी महावितरण शेतक-यांच्या पंपांचा वीजपुरवठा तोडण्याची मोहीम सुरूच ठेवली तर शेतकरी संघटना अधिकार्‍यांना वटणीवर आणण्याची मोहीम जिल्हाभरात उघडेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अरविंद घोडके यांनी दिला.
अणदूर (ता. तुळजापूर) येथे महावितरणने शेतकर्‍यांच्या पंपांची वीज तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार‍ दि. 27 ऑगस्ट रोजी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोडके हे बोलत होते. मोर्चात संघटनेचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब शेट्टे, शहराध्यक्ष बसवराज मुळे, शिवसेनेचे बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
घोडके बोलताना पुढे म्हणाले की, महावितरणने सुरू केलेली शेतकर्‍यांविरोधातील मोहीम अत्यंत दुर्दैवी आहे. सलग दोन वर्षे दुष्काळाचा चटका सहन करणार्‍या शेतकर्‍यांजवळ स्वत:चे पोट भरण्यासाठी पैसा नाही. तेव्हा वीजबिल भरण्यासाठी पैसा कोठून येणार, महावितरण मात्र गरीब शेतकर्‍यांच्या पाठीशी हातधुवून लागले आहे. मोठे उद्योगपती, कारखानदार, व्यावसायीकांना रान मोकळे सोडण्यात आले आहे. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकणे, अधिकार्‍यांना कोंडणे, वीज कर्मचार्‍यांना गावबंदी अशी आंदोलने शेतकरी संघटना करणार आहे. यासाठी जेल भोगण्याची पाळी जरी आली तरी मागे हटणार नाहीत. मोर्चात परिसरातील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मनसेचे निलेश मुळे, शिवाजी कांबळे, राजकुमार स्वामी, दीपक घुगे, कल्याणी मुळे, र्शीशैल्य चौधरी आदींच्या शिष्टमंडळाने कनिष्ठ अभियंता पी. एस. पाटील यांना निवेदन दिले आहे.
 
Top