लंडन : ब्रिटनमध्ये एका शालेय विद्यार्थ्याने एका बँकेवर सशस्त्र दरोडा टाकत २000 पौंड लुटल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे दरोडा टाकण्यासाठी त्याने खेळण्यातील बंदुकीचा वापर केल्याचे उघड झाल्याने या घटनेवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरोडा टाकणार्या विद्यार्थ्याला अटक करण्यात यश आले असून, येथील एका न्यायालयात हजर केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.इंग्लंडच्या वायव्येकडील लिव्हरपूलमध्ये असलेल्या 'बारक्लेस' या प्रसिद्ध बँकेच्या शाखेवर खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवत एका शाळकरी मुलाने दरोडा टाकला आहे. हुबेहूब खर्याखुर्या बंदुकीसारख्याच दिसणार्या खेळण्यातील बंदुकीचा बँकेच्या कॅशिअरला धाक दाखवून त्याच्याकडून २000 पौंडांची रक्कम हिसकावत त्याने तेथून पळ काढला होता. त्यानंतर घरी स्वत:च्या बेडरूममध्ये त्याने हे पैसे ठेवले होते. मात्र, बेडरूमची साफसफाई करीत असताना त्याच्या आईला तेथे २000 पौंड व खोटी बंदूक आढळून आल्यानंतर त्यांनी स्वत:हून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या शिक्षेवर येत्या १५ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. 'हे अतिशय गंभीर प्रकरण असून, हिंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन देणार्या व्हिडिओ गेम्सच्या प्रभावामुळेच मुलांमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
* साभार - पुण्यनगरी