बार्शी : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यंच्या जयंती प्रित्यर्थ प्रत्येक वर्षी देण्यात येणारा समाज परिवर्तन गौरव पुरस्कार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा वितरण सोहळा शुक्रवार दि. २७ सप्‍टेंबर रोजी संत तुकाराम सभागृह येथे होत असल्याची माहिती संस्थेच्या कार्यालयातील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव यांनी दिली. यावेळी मंडळाचे सदस्य, व्ही.एस.पाटील, बापूसाहेब शितोळे, दिलीप रेवडकर, दादासाहेब गायकवाड, अरुण देबडवार, व.न.इंगळे, व्ही.तिरुपती, सी.एस.मोरे आदि संचालक व संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
    डॉ.मुणगेकर यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे तसेच एकावेळेस त्यांच्या आजारपणामुळे हा पुरस्कार दोन वेळेस लांबणीवर पडला होता. कोकणातील डॉ. मुणगेकर यांचे मागासवर्गीय समाजासाठी मोठे योगदान असून लहानपणीच आईच्‍या देहवासानंतर त्‍यांच्‍या वडिलांनी चांगले संस्‍कार करुन त्‍यांना घडविले. शिक्षण सुरु असताना इंटरच्‍या परिक्षेत त्‍यांना फस्‍ट क्‍लास मिळाला नसल्‍याने त्‍यांना रडू आवरले नाही. परंतु त्‍यांनी मनाशी खुनगाठ बांधून मुंबई विदयापीठाच्‍या व्‍हाईस चान्‍सलरपदार्यंत मजल मारली. शिक्षकांनी दिलेल्‍या शिकवणीनुसार चांगले अर्थशास्‍त्रज्ञ बनून चांगल्‍या पुस्‍तकांची निर्मितीही केली. विद्यापीठाच्‍या व्‍हाईस चान्‍सलर पदानंतर नियोजन आयोगाचे सदस्‍य ते राज्‍यसभेचे सदस्‍य झालेल्‍या डॉ. मुणगेकर यांनी तरुण पणापासून समाजासाठी धडपड केली. वर्ण-जाती निर्मुलन करण्‍याचे व समाज परिवर्तनाचे काम त्‍यांचे आजही सुरुच आहे. मानवता व बंधुता या तत्‍त्‍वाच्‍या कामातून त्‍यांना अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.
    25 हजार रुपये रोख, सन्‍मानपत्र, स्‍मृतीचिन्‍ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. या पुरस्‍कार वितरण सोहळयासाठी उस्‍मानाबादचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री ना. दिलीप सोपल, न्‍या. बी.एन. तात्‍यासाहेब देशमुख, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी खासदार शिवाजी कांबळे, नगराध्‍यक्ष कादर तांबोळी आदी मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत.
 
Top