उस्‍मानाबाद जिल्‍हा अनेक अंगानी मागास म्‍हणून गणला जाणारा जिल्‍हा आहे. मराठवाडयात प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाने म्‍हणावी तेवढी हजेरी लावलीच नाही. महाराष्‍ट्रातील काही भागात पाऊस काळ चांगला झाला असला तरीही मराठवाडयात मात्र दुष्‍काळी परिस्थिती कायमच आहे, असे चित्र सध्‍या पहावयास मिळत आहे.
      उस्‍मानाबाद शहराला ‘उजनीचे पाणी’ या भवती अनेक दिवस सत्‍ताधारी मंडळींनी जनतेचे लक्ष वेधले होते. भविष्‍यात येवू घातलेल्‍या निवडणुका डोळयासमोर ठेऊनच सत्‍ताधारी आणि विरोधक दुष्‍काळग्रस्‍तांसाठी कोणी पाण्‍याचा टाक्‍या वाटप होते. तर कोणी जनावरांना चारा पाणी उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी छावणीच्‍या माध्‍यमातून आपणही दुष्‍काळी प्रश्‍नांवर जनतेच्‍या हिताचे काहीतरी कार्य करतो आहे, हे दाखवत होते.
       जून ते ऑगस्‍ट महिन्‍यात थोडाफार पावसाने हजेरी लावली होती. छोटी-मोठी तलाव, धरणे भरली. जनावरांसाठी उभारलेल्‍या छावण्‍या उठल्‍या. पावसाच्‍या पाण्‍यावर शेतकरी वर्गाला डोळयासमोर ठेवून ऊसाचे राजकारण जिल्‍हयात चर्चेचा विषय बनले आणि अडचणीत असलेला तेर येथील तेरणा सहकारी साखर कारखन्‍याच्‍या मदतीसाठी परजिल्‍हयातून मराठवाडयाच्‍या मागास भागात विकासाची मुहुर्तमेढ रोऊ पाहणारे सावंत बंधूनी भैरवनाथ शुगर सोनारी ता. परंडा च्‍या माध्‍यमातून मदतीचा हाथ पुढे केला आणि येऊ घातलेल्‍या लोकसभा निवडणुकामध्‍ये प्रा. तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानेश्‍वर पाटील यांच्‍या मदतीने उतरु पाहत आहेत. हे तेरणा कारखान्‍याला मदतीचे दाखवलेले गजर यावरुनच सिध्‍द होत आहे. तेरणा सहकारी साखर कारखान्‍याकडे जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे असलेले कर्ज कोणी केले? कारखाना दिवाळखोरीत कसा निघाला ? कारखान्‍यात काम करणा-या कामगारांना उपाशी मारण्‍यात कोणाचा हात आहे ? ह्यावर चर्चा करण्‍यापेक्षा शेतक-यांचा ऊस गाळप व्‍हावा, ऊसाला हमीभाव मिळावा, ह्या भागातील सुशिक्षित बेरोजगारांच हाताला काम मिळावे, ह्या हेतूने म्‍हणा किंवा येऊ घातलेल्‍या निवडणुका डोळयासमोर ठेऊनच का होईना म्‍हणा, सत्‍ताधारी संचालक मंडळ व आमदार ओमराजे निंबाळकर यांनी हा निर्णय घेतला आहे. सावंत बंधू भैरवनाथ शुगरच्‍या माध्‍यमातून तेरणा चांगल्‍याप्रकारे चालवतील. शेतक-यांच्‍या ऊसाला चांगला भाव देतील, कामगारांना पगार देतील आणि बँकेचे झालेले कर्जही फेडतील, अशा प्रकारचा आशावाद ठेवण्‍यास सध्‍या वाव आहे.
        ओमराजे निंबाळकर, ज्ञानेश्‍वर पाटील, प्रा. रविंद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले, कल्‍पना नरहिरे, गणेश सोनटक्‍के, दत्‍ता आण्‍णा साळुंखे, प्रा. गौतम लहके, सुधीर अण्‍णापाटील, कमलाकर चव्‍हाण या अशा अनेक शिवसैनिकांना येऊ घातलेली लोकसभा, विधानसभ निवडणुक ही जिंकण्‍याचीच स्‍वप्‍न पडत आहेत. कधी उदयोगपती राजेंद्र मिरगणे, कधी सावंत बंधू तर कधी बोरकर यांच्‍या मदतीने शिवसैनिक जनतेसमोर जाताना दिसत आहे. पण जनता शवेटी जनताच आहे. कधी काय करेल सांगता येत नाही. सध्‍यातरी असे म्‍हणणे योग्‍य नाही की, कारखाने भाडेतत्‍वावर सुरु करुन दुष्‍काळी परिस्थितीमध्‍ये केलेल्‍या कार्यावर जनता निवडणुकांत बदल घडवेल, पण सत्‍ताधारी मंडळीवरील नाराजीही नाकारता येणार नाही. तेंव्‍हा विरोधकानी चालवलेली येऊ घातलेली निवडणुकांची तयारी आणि सत्‍ताधारी मंडळींचा बेभरवसापणा मतदारांना आकर्षित करण्‍याचा डाव उधळला जाऊ शकतो, यात तिळमात्र शंका नाही.
        ‘‘सहकार विना नाही उध्‍दार’’ अशा म्‍हणी प्रवेशद्वारावर, सरकारी कार्यालयामध्‍ये, सभागृहामध्‍ये वाचायला चांगल्‍या वाटतात. पण सहकार राबवणे हे सहकारी कायदयाची भाषणापुरती मक्‍तेदारी समजणा-या सत्‍ताधारी व सत्‍तेबाहेरील नेत्‍यांना खुपच अवघड काम आहे. सहकाराच्‍या नावाने गळ काढणारे स्‍वःहाकार करु लागले आहेत. म्‍हणून असेही म्‍हणता येते की, विना सहकार पोसले जाणारी नाहीत गद्दार....! उस्‍मानाबाद जिल्‍हयात शासकीय दुध संघाची अवस्‍था सध्‍या काय आहे हे जिल्‍हयातील जनता जवळून पाहते आहे. सहकारी म्‍हणवणारे जनतेच्‍या, शेतक-यांच्‍या मालकीचे कारखाने मोडीत काढून, जिल्‍हा मध्‍यवर्ती बँक मोडकळीस आणून खासगी कारखाने, खासगी पतसंस्‍था यांचा जिल्‍हयात सर्वत्र सुकाळ जाणवतो आहे.    भैरवनाथ शुगरचे मालक सावंत बंधू यांनी तेरणा चालू करण्‍याचा घेतलेला निर्णय म्‍हणजे उस्‍मानाबाद जिल्‍हातून लोकसभा निव्‍उणुकात कारखान्‍याच्‍या सत्‍ताधारी संचालक मंडळींनी सहकार्य करण्‍याची हमीच होय. ओमराजे निंबाळकर यांनाही खंबीर साथ हवी होतीच ती भैरवनाथच्‍या रुपाने मिळाली, असेच म्‍हणावे लागेल.
       उस्‍मानाबाद जिल्‍हयातील तुळजापूर तालुक्‍यातील तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्‍याला भक्‍कम स्‍वरुपाचा वाली मिळण्‍याची अत्‍यंत गरज आहे. राष्‍ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सत्‍ताधारी नामदार मधुकरराव चव्‍हाण हे जिल्‍हयाचे पालकमंत्री तथा राज्‍याचे पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री असतानाही तुळजाभवानी कारखाना बंद का ? असा सवाल जनतेत चर्चेला जात आहे. एकीकडे ना. मधुकरराव चव्‍हाण हे सत्‍ताधारी पक्षातील विकासाभिमुख नेतृत्‍व म्‍हणून जिल्‍हयाचे नाव महाराष्‍ट्रात गाजवताना दिसत आहे. पण त्‍यांच्‍या भोवतालची पक्षातील पिलावळ मधुकरराव चव्‍हाण यांना सहकार्य करीत नाही. म्‍हणून तर जिल्‍हयात म्‍हणावी तेवढी विकास कामे होताना दिसत नाहीत. खासगी उदयोगपती सहकारी कारखाने चालवण्‍यास घेतात पण सहकार व्‍यवस्थित चालू शकत नाही, अशी अवस्‍था निर्माण झाली आहे.
        उस्‍मानाबाद जिल्‍हयात भैरवनाथ शुगरच्‍या माध्‍यमातून उदयोगास प्रारंभ केलेल्‍या सावंत बंधुना भविष्‍यात राजकीय भवितव्‍य साध्‍य करण्‍यात यश मिळेलही. पण‍जिल्‍हयाच्‍या राजकारणावर विकासाची स्‍वप्‍नं दाखवुन अनेक वर्षी सत्‍तेत राहून तिरढावलेला पांढरपेशी पुढाका-यांना नुसते बंद पडलेले साखर कारखान्‍यास चालवण्‍यास घेतल्‍याने पायबंद बसेल का? सत्‍ताधारी मंडळींनी चिंतन करण्‍याची गरज वाटते.
ओमराजे निंबाळकर व तेरणाच्‍या संचालक मंडळांनी शेतकरी हित डोळयासमोर ठेऊन भैरवनाथ शुगरला तरेणा भाडेतत्‍वावर देण्‍याचा घेतलेला निर्णय हा कौतुकास्‍पद आहे.
        अपक्षा एकच की, शेतक-यांच्‍या ऊसाला हमीभाव मिळाला पाहिजे. कारखान्‍यात काबाडकष्‍ट करणा-या कामगारांना योग्‍य मोबदला मिळाला पाहिजे. तेंव्‍हा कुठे भैरवनाथ शुगरने दिलेला मदतीच्‍या हाताला तेरणाकरांची साथ मिळेल असे वाटते.....!

संतोष बुरंगे 
नळदुर्ग
 
Top