नळदुर्ग -: येत्‍या तीन दिवसात महामार्गावरील अतिक्रमण काढण्‍याची नोटीस नळदुर्ग येथील अतिक्रमणधारकांना दिल्‍याने प्रचंड खळबळ उडाली आहे. 
    नळदुर्ग येथील राष्‍ट्रीय महामार्गावरील असलेले अतिक्रमण सात दिवसांत संबंधित अतिक्रमणधारकांनी काढून घ्‍यावे, अन्‍यथा असलेले अतिक्रमण काढण्‍याची नोटीस उपविभागीय अभियंता राष्‍ट्रीय महामार्ग उपविभाग, उमरगा यांनी नळदुर्ग येथील बसस्‍थानक समोरील अतिक्रमणधारक दुकानदार , चहा, पान, फळांच्‍या टपरीवाल्‍यांना दिली आहे. यापूर्वी नळदुर्ग येथील अतिक्रमण राष्‍ट्रीय महामार्ग विभागाकडून वेळोवेळी अतिक्रमण काढण्‍यात आले होते. मात्र पुन्‍हा लगेचच याठिकाणी अतिक्रमण पुर्ववत होऊन आपआपले धंदे फोफावलेले दिसत आहे. अतिक्रमण काढल्‍यानंतर पुन्‍हा त्‍या ठिकाणी महामार्गालगत अतिक्रमण होऊ नये, याबाबत प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. या नोटीसानंतर अदयापपर्यंत कुणीही अतिक्रमण स्‍वतःहून काढल्‍याचे दिसत नाही.
    राष्‍ट्रीय महामार्ग विभागाकडून नळदुर्ग बसस्‍थानकासमोर असलेल्‍या महामार्गालगत असलेल्‍या अतिक्रमणधारकांनी तीन दिवसात अतिक्रमण करुन थाटलेली दुकाने, पानटप-या, हॉटेल हे काढून घ्‍यावे अन्‍यथा तीन दिवसानंतर कारवाई करुन पोलीस बंदोबस्‍तात हे अतिक्रमण काढून टाकण्‍याची नोटीस बजावण्‍यात आली आहे. सध्‍या नळदुर्ग येथे महामार्गालगत दीडशे पेक्षा जास्‍त व्‍यापा-यांनी आपली दुकाने थाटली आहे. अतिशय दाटीवाटीत व महामार्गालगत दुकाने थाटली असल्‍याने नागरीक तसेच महामार्गावरील वाहतुकीला याचा मोठा त्रास होत आहे. त्‍यामुळे महामार्ग विभागाने हे अतिक्रमण काढून टाकण्‍याची नोटीस बजावली आहे. नोटशीत दिलेली मुदत 24 सप्‍टेंबर रोजी संपत आहे. त्‍यानंतर कुठल्‍याही दिवशी महामार्ग विभाग हे अतिक्रमण काढून टाकण्‍याची कारवाई करण्‍याची शक्‍यता आहे. राष्‍ट्रीय महामार्ग विभागाकडून अनेकदा महामार्गालगतची अतिक्रमणे काढून टाकण्‍यात आली आहेत. मात्र महामार्ग विभागाचा गलथान कारभारामध्‍ये काढलेली अतिक्रमणे पुन्‍हा त्‍याचठिकाणी महामार्गालगत पुर्ववत झाली आहे. त्‍यामुळे एकदा अतिक्रमण काढून टाकल्‍यानंतर पुन्‍हा त्‍या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, याची दक्षता निदान यावेळी तरी महामार्ग विभागाकडून घेणे गरजेचे आहे.
 
Top