तिरुचिरापल्ली (तमिळनाडू) :- तमिळी नागरिक मेहनती, प्रामाणिक आणि रॉयल आहेत. तमिळ आणि गुजराती नागरिक दुधात साखर विरघळावी तसे एकमेकांसोबत मिळून मिसळून राहतात, असे सांगून गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) मतदानासाठी तमिळी जनतेला साद घातली.
    भोपाळमधील भाजपचा महामेळावा गाजविल्यानंतर नरेंद्र मोदी थेट तमिळनाडूला गेले आहेत. भोपाळमधील सभेत मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली, भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान आदी नेत्यांना एका मंचावर आणले होते. यावेळी अडवाणींची नाराजी दूर करण्यासाठी मोदींनी त्यांचे आशिर्वादही घेतले. अडवाणी यांनीही मोदींची स्तुती करीत नाराजी मावळल्याचे संकेत दिले होते.
    यशाच्या या लाटेवर स्वार होत नरेंद्र मोदी आज तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे दाखल झाले आहेत. यावेळी सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, की गुजरातला भारताचे मॅंचेस्टर करण्यासाठी तमिळी जनतेने मोठे योगदान दिले आहे. गुजराती जनताही तमिळनाडूच्या विकासासाठी काम करीत आहे. समस्या दोन राज्यातील लोकांमध्ये नव्हे तर केंद्रात आहे. केंद्र सरकार कमकुवत असल्याने विकास साधण्यात बरेच अडथळे येत आहेत. गुजरात कापूस उत्पादक राज्य आहे. गुजरातमधील कापसावर तमिळनाडूत प्रक्रिया केली जाते. दोन्ही राज्यांमधील बऱ्याच बाबी सारख्या आहेत. दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भरीव कामगिरी केली आहे. गांधीजी गुजरातमधून होते तर राजाजी तमिळ होते.
    दहशतवादी हल्ल्यावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, की पाकिस्तानमधील दहशतवादी भारतात घूरखोरी करून आपल्या जवानांना ठार मारतात आणि आपण त्यांच्या नेत्यांना बिर्याणी खाऊ घालतो. इटलीच्या नौदलाचे जवान आपल्या मच्छिमारांना ठार मारतात आणि आपण केवळ बघ्याची भूमिका घेतो. कॉंग्रेस सरकारच्या काळात दहशतवादी हल्ल्यात जेवढे जवान शहिद झाले असतील तेवढे एखाद्या युद्धातही शहिद झाले नसतील. आपण केंद्रात कमकुवत असल्याने शेजारी राष्ट्रे त्याचा लाभ उचलत आहेत.

* साभार - दिव्‍यमराठी
 
Top