मुंबई : यंदाच्या वर्षी हज यात्रेसाठी जाणा-या भाविकांना शासनाने चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून मक्का-मदिना येथे त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही यासाठी शासन पुरेपुर प्रयत्न करेल, असे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी केले.
    येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बुधवारी सायंकाळी हज यात्रेकरुंची पहिली तुकडी मक्का-मदिनाकडे रवाना झाली. त्यांना निरोप देण्यासाठी तेथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय हज समितीचे सदस्य खासदार सालिम अन्सारी, इलियास खान पठाण, आमदार कृपाशंकर सिंह, आमदार एम.एम.शेख, केंद्रीय हज समितीचे माजी सदस्य इब्राहीम शेख (भाईजान), केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अताउर रहमान, राज्य हज समितीचे मुख्य अधिकारी सिराज इनामदार यांच्यासह हज यात्रेकरु उपस्थित होते.
    खान म्हणाले, राज्यातील हज यात्रेकरुंना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी राज्य हज समितीमार्फत हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला आहे. यावर दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अनेक हज यात्रेकरु आपल्या शंकांचे समाधान करुन घेत आहेत. हज यात्रेकरुंच्या सेवेसाठी यापुढेही ही सेवा सुरु ठेवली जाणार आहे. हज यात्रा, तेथील राज्य हज समितीची कार्यालये, त्यांचे पत्ते, संपर्क क्रमांक, संबंधित अधिकारी, त्यांचे संपर्क क्रमांक, हज यात्रा कालावधीत घ्यावयाची दक्षता आदी परिपूर्ण माहिती असलेली उर्दू, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तिका तयार करण्यात आली असून हज यात्रेकरुंना त्यांच्या प्रवास कालावधीत याचा निश्चितच उपयोग होईल.
    भारतातील हज यात्रेकरुंचा कोटा हा 2001 च्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे. हा कोटा 2011 च्या जनगणनेच्या आधारे निश्चित करणे गरजेचे असून यासाठी केंद्रीय हज समितीने प्रयत्न करावेत. त्यामुळे आपल्या देशाला वाढीव कोटा मिळेल, असे श्री.खान यावेळी म्हणाले.
    पुर्वी महाराष्ट्रात फक्त मुंबईतच हज हाऊस असल्याने विदर्भ-मराठवाड्यातील हज यात्रेकरुंची गैरसोय होत होती. त्यामुळे राज्य शासनाने मागील वर्षी नागपूर येथे भव्य हज हाऊस सुरु केले असून त्याचा विदर्भवासीयांबरोबरच मध्य भारतातील हज यात्रेकरुंना चांगला उपयोग होत आहे. औरंगाबाद येथेही असेच भव्य हज हाऊस निर्माण केले जाणार असून त्यासाठी जागा निश्चिती आणि निधीची तरतूद करण्यात आली आहे. नागपूरप्रमाणे औरंगाबादेतील हज हाऊसही लवकरच मराठवाड्यातील हज यात्रेकरुंसाठी उपलब्ध केले जाईल, असे ते म्हणाले.
 
Top