उस्मानाबाद : वृद्ध इसमाची ९५ हजार रुपये रक्कमेची बॅग बसस्थानकावरील कँटीनमधून अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना मंगळवारी उस्‍मानाबाद येथे सकाळी घडली. दरम्यान बँकेतून पैसे काढताना वृद्धाच्या मागावर असलेल्या एका संशयिताचे फुटेज पोलिसांना मिळाले असून त्यावरुन तपास सुरु आहे.
     भूमी अभिलेख कार्यालयातील सेवानवृत्त कारकून अरुण जगन्नाथ माळवदकर (वय ६२, रा. संत गोरोबाकाका नगर) यांनी २४ सप्टेंबर रोजी सकाळी उस्‍मानाबाद शहरातील बसस्थानकानजीक असलेल्या एका बँकेतून ९५ हजार रुपये काढले. सदर पैसे त्यांना बीड येथील नातेवाईकाकडे पोहच करायचे होते. पैसे काढल्यानंतर त्यांनी आपली सायकल बसस्थानकानजीक एका पानदुकानावर लावली. त्यानंतर बीडला जाण्यासाठी बसस्थानकावर येवून ते सोलापूर औरंगाबाद या बसमध्ये बसले. त्या ठिकाणी एका अज्ञात इसमाने ‘तुमच्या शर्टाला काहीतरी लागले आहे’ असे म्हणून धुण्यासाठी खाली उतरण्यास सांगितले. सदर इसमही त्यांच्याबरोबर उतरला. त्यानंतर दोघेही बसस्थानकावरील कँटीनमध्ये गेले. मात्र बॅग टेबलवर ठेवून माळवदकर हे वॉशबेसीनवर गेले असता सदर अज्ञात इसमाने ९५ हजार रुपये असलेली बॅग लंपास केल्याची फिर्याद माळवदकर यांनी दिली आहे. त्यावरुन अज्ञात इसमाविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सपोनि नामदेव जाधव हे करीत आहेत
    बसस्थानकानजीक असलेल्या बँकेतून पैसे काढल्याची माहिती माळवदकर यांनी पोलिसांना दिली. तसेच सदर बँकेत असतानापासून एक इसम मागावर असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. बसस्थानकातील कँटीनमधून चोरी करणार्‍या इसम हा अंदाजे २७ वर्षाचा असून त्याच्या अंगावर चौकडा शर्ट असल्याचे माळवदकर यांनी पोलिसांना सांगितले. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि माधवराव गुंडीले, शहर ठाण्याचे सपोनि नामदेव जाधव यांनी बँकेत जावून फुटेज मिळविले. त्यात एक इसम संशयितरित्या बँकेत चकरा मारत असल्याचे व फोनवरुन बोलत आत बाहेर करत असल्याचे दिसत असल्याचे सपोनि जाधव यांनी सांगितले. मिळालेली माहिती व सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित इसमाच्या हालचालीद्वारे पोलिस तपास करीत आहेत.
 
Top