नळदुर्ग -: येथील कुरनूर (बोरी धरण) मध्‍यम प्रकल्‍पातून कॅनलद्वारे पाणी सोडण्‍यात आल्‍याने ऐतिहासिक किल्‍ल्‍यातील प्रेक्षणीय स्‍थळ असलेल्‍या दोन धबधब्‍यापैकी एक धबधबा बंद पडण्‍याच्‍या मार्गावर आहे. त्‍यामुळे राज्‍यासह परप्रांतातून नळदुर्गला भेट देणा-या पर्यटकांची निराशा होत आहे.
    श्री क्षेत्र तुळजापूर, नळदुर्ग शहर व अणदूर गावाला नळदुर्ग येथील बोरी धरणातून पाणी पुरवठा करण्‍यात येतो. तब्‍बल तीन वर्षानंतर बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्‍याने शुक्रवार दि. 20 सप्‍टेंबर रोजी धरणाच्‍या सांडव्‍यातून पाणी वाहण्‍यास सुरुवात झाली. हे पाणी बोरी नदीच्‍या पात्रातून पुढे नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्‍ल्‍यातील प्रेक्षणीय स्‍थळ असलेल्‍या नर-मादी धबधब्‍यातून धो-धो कोसळण्‍यास सुरुवात झाली. याचे वृत्‍त प्रसिध्‍द होताच पर्यटकांची एकच गर्दी उसळली. यामध्‍ये शालेय, महाविद्यालयीन, शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे कर्मचारी, अधिकारी यांनी भेट देऊन डोळ्याचे पारणे फिडणारे विलोभनीय दृश्‍य धबधबा व किल्‍ला पाहिले.
नळदुर्गपासून जवळपास दहा किलोमीटर अंतरावर असलेल्‍या शहापूर (ता. तुळजापूर) येथील साठवण तलाव अपु-या पावसामुळे भरले नसल्‍याच्‍या कारणावरुन बोरी धरणातून बुधवार दि. 25 सप्‍टेंबर रोजी सकाळी सव्‍वा नऊ वाजल्‍यापासून प्रति सेकंद 25 क्‍यूसेक (घनफूट) पाणी कॅनलद्वारे सोडण्‍यात येत आहे. त्‍यामुळे साहजिकच बोरी नदीला वाहून जाणारे पाणी कमी झाल्‍याने किल्‍ल्‍यातील कोसळणा-या नर-मादी धबधब्‍यापैकी ‘नर’ हा धबधबा बंद झाल्‍यात जमा आहे. त्‍यामुळे खूप दुरवरुन येणा-या पर्यटकांची निराशा होत असून नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.
 
Top